Saturday, November 15, 2025

दुरगम घाटी दोय...

दुरगम घाटी दोय...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

संत कबीराचा एक दोहा आहे.... चलौ चलौ सब कोई कहै। पहुंचे विरला कोय ।। एक कनक और कामिनी । दुरगम घाटी दोय ।।

अर्थ : चला चला असं म्हणत सगळेच वाटसरू मार्गानं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, मनात इच्छिलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपडतात, पण तिथवर पोहोचणारा एखादाच विरळा...! कारण हा मार्ग अत्यंत दुर्गम आहे. या मार्गावर कनक आणि कामिनी नावाच्या दोन घाटीत फसल्यामुळं मनात इच्छा असूनही तिथवर पोहोचणं शक्य होत नाही.

एकोणिशे पासष्ट सालची गोष्ट. विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकरांना एका कॉलेजच्या इमारतीच्या गच्चीवर बसवलेल्या दुर्बिणीचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रण आलं. डॉक्टरसाहेब गेले. दुर्बिणीचं उद्घाटन केलं. भाषणही केलं. त्या समारंभाचा फोटोसकट वृत्तांत दुसऱ्या दिवशीच्या अनेक वृत्तपत्रात छापून आला होता. महाराष्ट टाईम्स आणि टाईम्स ऑफ इंडियाने देखील या उद्घाटन सोहळ्याची दखल घेतली. पण त्याच बरोबर एक अग्रलेख लिहून डॉक्टर नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञाचा वेळ अशा प्रकारची उद्घाटनं वगैरे करण्यात वाया जाऊ नये म्हणून प्रेमाची सूचना देखील केली होती.

त्या दिवसापासून डॉक्टर नारळीकरांनी त्यांना आलेल्या अशा प्रकारच्या समारंभाला जाण्याचं टाळलं. आयोजकांना नम्रपणे नकार द्यायला सुरुवात केली. अलीकडेच एका भाषणात डॉक्टर नारळीकर याचा उल्लेख करून म्हणाले, ‘मला दर आठवड्याला साधारण दोन तीन समारंभाची आमंत्रणं येतात. मी ती स्वीकारली असती, तर आठवड्याला साधारण दहा-बारा तास मोडले असते. वर्षाचे बावन्न आठवडे धरले, तर या हिशेबाने वर्षाचे पाचशे-सहाशे तास गेले असते. गेली चाळीस वर्ष मी हा वेळ वाचवतो आहे.

स्वतःला प्रसिद्धी आणि सवंग लोकप्रियतेपासून दूर ठेवून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणारे डॉक्टर जयंत नारळीकर. मोठी माणसं मोठी होतात याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं ध्येय निश्चित झालेलं असतं. मार्गावरच्या प्रलोभनाला बळी न पडणारा माणूसच यशाचं शिखर गाठू शकतो. अन्नपूर्णा संस्थेच्या प्रेमाताई पुरव, आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अनुताई वाघ, तंत्र शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेले विश्वनाथ कराड, धरण विस्थापितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या मेधा पाटकर, शिवाजी या तीन अक्षरी मंत्रानं नादावलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. कुष्टरोग्यांच्या सेवेतून उजाड माळरानावर नंदनवन फुलवणारे आनंदवनातले बाबा आमटे, त्याच बाबांचा वारसा पुढे चालवणारी त्यांची मुलं आणि नातवंडं, व्यसनमुक्तीचा ध्यास घेतलेले मुक्तांगणचे डॉक्टर अनिल अवचट, व्यावसायिक यशाकडे पाठ फिरवून समाजसेवेचं व्रत अंगिकारलेले डॉक्टर अभय आणि राणी बंग हे दांपत्य, भारतीय अभिजात संगितात नवं आणि जुनं यांच्या समन्वयातून एक वेगळी परंपरा निर्माण करून पिढ्यान् पिढ्यांना पथदर्शक ठरलेले पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित कुमार गंधर्व, पंडित सी. आर. व्यास...!

ही आणि यासारखी अशी अनेक नावं सांगता येतील. ही माणसं आणि आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय पांढरपेशे मंडळी यांत तसा काही फरक असतो काय ? त्यांनासुद्धा आपल्यासारखे दोनच हात असतात. पण त्या हातांचा उपयोग ते विधायक कार्याकरिता करतात, त्यांना देखील आपल्यासारखे दोनच डोळे असतात पण त्यांच्या डोळ्यांनी आणि आपल्या डोळ्यांनी जे पाहिलं जातं त्यात मात्र फरक असतो.

महान व्यक्ती त्यांच्या डोळ्यांचा उपयोग सामान्यांप्रमाणे संध्याकाळी दूरदर्शनवरचे नाचगाण्याचे कार्यक्रम, विवाहबाह्य संबंधात अडकलेल्या रटाळ मालिका, नियमित दाखवली जाणारी अवॉर्ड फंक्शन्स, विनोदाच्या नावावर सुरू असलेला प्रायोजिक पानचटपणा आणि रतीब घातल्यासारखे खेळले जाणारे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी करत नाहीत.

जे आपल्याला आपल्या सामान्य डोळ्यांनी दिसत नाही ते ही माणसं त्यांच्या डोळ्यांनी पाहतात. त्यांच्यासाठी डोळे हे फक्त पाहण्याचा एक अवयव न राहता ज्ञानसाधनेचं इंद्रिय बनतं. डोळ्यांचा नीट उपयोग केल्यामुळं त्यांना दृष्टी प्राप्त होते, त्या दृष्टीपासून ते वेगळ्या सृष्टीची निर्मिती करतात. आणि आपण मात्र...?

सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याचा जीवनपट पाहिला, तर साधारण वीस-बावीस वर्षांपर्यंत थोडंफार शिक्षण, पुढे जेमतेम नोकरी आणि त्यानंतर लग्न आणि संसार, मुलंबाळं, सण-समारंभ, दूरदर्शनवरचे करमणुकीचे कार्यक्रम आणि वेळ वाया घालवणारे क्रिकेटचे सामने...!

झालंच तर प्रापंचिक समस्यांवर झटपट उपाय करणारा चमत्कार करणारा एखादा बुवा-बाबा-बापू. धार्मिकतेच्या नावाखाली एखाद्या मठासमोर, देवळासमोर तास न् तास रांगा लावून घेतलेलं देवदर्शन, पार्ट्या आणि पिकनिक... अशा चाकोरीत अडकून आपण सामान्य माणसं आपलं उभं आयुष्य वाया घालवतो.

काहीतरी भव्य-दिव्य उदात्त करणे दूरच, पण एखादा चांगला छंद देखील आपण जोपासू शकत नाही. आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून आपण काय ठेवतो ? पाच-पंचवीस तोळे सोनं, राहती जागा आणि जुनी भांडी. थोडासा बँक-बॅलन्स...! आपल्या मुलाबाळांसाठी या व्यतिरिक्त आपण काहीही ठेवू शकत नाही. कारण आपण याहून अधिक काही कमावलेलंच नसतं.

आपल्या हातून काहीतरी भव्य कां घडलं नाही याची कारणं शोधली, तर कबीराचा हा दोहा बरंच काही सांगून जातो. चलौ चलौ सब कोई कहै। पहुंचे विरला कोय । एक कनक और कामिनी । दुरगम घाटी दोय ।। आपणही आपल्या ध्येयाप्रत पोहोचावं असं म्हणणारे आपल्यापैकी बरेच जण असतात. पण ते तिथवर पोहोचत नाहीत कारण त्यांच्या मार्गात कनक आणि कामिनीचा दुर्गम घाट येतो. या घाटातून पार पडणं

दुरापास्त होतं आणि तिथंच अडकून पडल्यामुळं यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणं जमतच नाही. बघता बघता आयुष्य संपून जातं. कबीरानं सांगितलेल्या कनक आणि कामिनीच्या घाटातच जीवनाची इतिश्री होते.

या इथं कनक म्हणजे सोनं आणि कामिनी म्हणजे स्त्री असा शब्दशः अर्थ न घेता, कनक म्हणजे भौतिक संपत्ती आणि कामिनी म्हणजे शरीराला चटक लावणारी ऐहिक सुखं हा अर्थ अभिप्रेत आहे. या तथाकथित सुख आणि संपत्तीच्या मागे लागलेल्या माणसाला इतर काहीही करणं शक्य होत नाही. संपत्ती आणि सुख मनाला भुरळ घालतात, चित्ताला चळवतात, बुद्धीला बिघडवतात.

ज्याचं मन बुद्धी आणि चित्त स्थिर नाही अशा माणसाकडून काही असामान्य कसं घडणार? मिळालेल्या संधी नीट उमगतच नाहीत. संधी गमावल्यामुळं आणि वेळेचा अपव्यय केल्यामुळं आपला प्रवास हा सामान्याकडून असामान्यत्वाकडे न होता उलट दिशेनं म्हणजे सामान्याकडून अती सामान्यत्वाकडे असाच होतो. उलट दिशेनं होणाऱ्या प्रवासालाच अधोगती म्हणतात. अधोगती रोखून जर उन्नतीकडे झेप घ्यायची असेल तर, कबीरानं दोह्यात सांगितलेल्या दोन घाटींपासून जरा सांभाळूनच राहायला हवं अन् आपल्या ध्येयावरची नजर अविचल राखायला हवी.

Comments
Add Comment