Saturday, November 15, 2025

अरुण गवळींची दुसरी कन्याही राजकारणात

अरुण गवळींची दुसरी कन्याही राजकारणात

भायखळ्यातून महापालिका निवडणूक लढवणार

सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन २००७मध्ये अरुण गवळी यांची कन्या गीता आणि वहिनी वंदना गवळी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती राजकारणात प्रवेश करत आहे. अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी याही यंदा महापालिका निवडणूक लढवून राजकारणात पाऊल टाकत आहेत. योगिता गवळी यांनी भायखळा विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०७मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार करत प्रभागात विकासकामाला सुरुवातही केली आहे. त्यामुळे गीता गवळी, वंदना गवळी पाठोपाठ आता योगिता गवळीही महापालिकेच्या निवडणूक रिंगणात दिसणार आहेत.

अरुण गवळी यांनी १९९६मध्ये अखिल भारतीय सेना पक्षाची स्थापना करत राजकारणात पाऊल टाकले होते. त्यानंतर झालेल्या सन २००२च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अभासेचे सुनील घाटे हे पहिले नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सन २००४मध्ये झालेल्या विधानसभेत निवडणुकीत अभासेच्यावतीने अरुण गवळी यांच्यासह पक्षाचे २० उमेदवार निवडूक रिंगणात उतरले होते. त्यात अरुण गवळी हे भायखळा वरळी विधानसभेतून निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या सन २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत अभासेच्यावतीने अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी आणि वहिनी यांनी महापालिका निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. अभासेचे दोन नगरसेवक हे महापालिकेत निवडून आले होते. त्यानंतर गीता गवळी आणि वंदना गवळी या सन २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्या. पण सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत वंदना गवळी या पराभूत झाल्या आणि गीता गवळी या विजयी झाल्या होत्या.

परंतु आता आगामी निवडणुकीसाठी गीता गवळी यांचा प्रभाग क्रमांक २१२ हा पुन्हा महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे गीता गवळी यांचा प्रभाग खुला झाला आहे. तर मागील निवडणुकीत वंदना गवळी यांनी निवडणूक लढवून त्या पराभूत झाल्या होत्या, त्याच प्रभागात आता अरुण गवळी यांची दुसरी कन्या योगिता निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

योगिता गवळी यांनी सोशल माध्यमांवर जाहिरातबाजी करत आपण या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रभाग क्रमांक २०७ हा यावेळेस खुला प्रवर्ग झाला असल्याने योगिता गवळी यांनी या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहिर केले. याप्रभागातून सध्या भाजपचे रोहिदास लोखंडे यांची पत्नी सुरेखा लोखंडे या नगरसेविका निवडून आल्या होत्या. हा प्रभाग खुला झाल्याने येथून रोहिदास लोखंड निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

योगिता गवळी यांनी मागील काही महिन्यांपासून या प्रभागात कामे करण्यास सुरुवात केली असून नागरिकांच्या समस्या विचारात घेता महापालिकेच्यावतीने काही कामे करुन घेण्यासाठी त्या पुढे असतात. योगिता गवळी यांना प्रभाग २०७मधून लढवून ही जागा अभासेकडे ठेवण्याचा अरुण गवळी आणि गीता गवळी यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे अरुण गवळी यांच्या वहिनी वंदना गवळी यांनी प्रभाग २०७मधून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने प्रभाग क्रमांक २०७ किंवा १९९मधून वंदना गवळी यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये प्रभाग २०७ भाजपाला जाणार असल्याने वंदना गवळी यांना प्रभाग १९९मध्ये म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या समोर निवडणूक लढवावी लागणार आहे.

प्रभाग क्रमांक २०७चा सन २०१७ मधील निकाल

  1. भाजप सुरेखा लोखंडे : मते ६००५
  2. शिवसेना आशा चव्हाण : मते ५९६२
  3. अभासे वंदना गवळी : मते ५६६१
Comments
Add Comment