विशेष : लता गुठे
भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन असलेली आपली भारतीय संस्कृती तिच्या महानतेमुळे जगात ओळखली जाते, यामध्ये एकाच गोष्टीचा समावेश नाही अनेक समृद्ध आणि अजरामर गोष्टी आहेत. धर्म, तत्त्वज्ञान, गणित, कला, संगीत, काव्य आणि नृत्य यांसारख्या अनेक क्षेत्रांवर प्रभाव टाकला आहे. ही मूल्ये, श्रद्धा आणि परंपरांचा एक शक्तिशाली आरसा आहेत, जी संस्कृती मनामनाचा शेतू जोडून समस्त मानव जातीचा विचार करते आणि त्यांना एक ओळख देते अशी आपली संस्कृती आहे. भारताने जगाला दिलेल्या समृद्ध वारशामध्ये मानवी मूल्यांना महत्त्वाचे स्थान आहे. यामध्ये विविधतेतील एकता, आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचा समावेश अति प्राचीन संस्कृतीमध्ये आढळतो. याच मूल्यांनी माणसांना तेजस्वी विचार दिले. त्यांच्यामध्ये संस्कार रुजवले. पारतंत्र्यामध्ये भारत भूमीच्या सन्मानार्थ अनेकांनी समर्पित केले, काहींच्या लेखणीला धार आली. काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. यापैकीच एक अनमोल काव्यरत्न म्हणजे वंदे मातरम् हे अजरामर गीत होय. वंदे मातरम् म्हटल्याबरोबर मनाला स्फूर्ती येते आणि रक्तात चैतन्य निर्माण होते. कोणती शक्ती आहे या शब्दांमध्ये हा विचार अनेक वेळा मनात तरळून गेला. मला कळायला उमगायला लागल्यापासून हे अमर गीत मी वाचत आले आहे. ऐकत आले आहे; परंतु आज विचार करावासा वाटला म्हणून या लेखाचा प्रपंच मांडला...
भारतीय जनमानसाच्या चेतनेत खोलवर रुजलेले एक अमर गीत म्हणजे -“वंदे मातरम्”. हे दोन शब्द केवळ राष्ट्रगीताची ओळ नाहीत, तर ते करोडो भारतीयांंच्या मनामध्ये रुजलेला एक मंत्र आहे. या संपूर्ण प्रार्थना गीतामध्ये भारताचा इतिहास, संस्कृती, मातृत्व, श्रद्धा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे रक्त मिसळले आहे, असे मला वाटते. “वंदे मातरम्” ही केवळ एक घोषणा नाही, तर ती भावना आहे, शपथ आहे आणि भक्तीचा ओलावा असलेली एक पवित्र प्रतिज्ञा आहे.
या मागचा इतिहास असा आहे... इंग्रजांनी भारत भूमीवर हळूहळू पाय रोवायला सुरुवात केली आणि आपले साम्राज्य स्थापन केले. भारत देश संपूर्ण पारतंत्र्यात गेला. पुढे भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिवीरांची एक लाट निर्माण झाली. भारताच्या विविध राज्यांमध्ये अनेक चळवळी उभ्या राहिल्या. १८५७ च्या राष्ट्रीय उठावानंतर १८७० च्या दशकात बंगालमध्ये भारतीय पुनरुत्थानाची उर्मी जागृत झाली. त्याच काळात बंगालमध्ये एक देशभक्त लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय उदयास आले. त्यांच्या लेखणीतून १८८२ साली ‘आनंदमठ’ हे कादंबरीरूप महाकाव्य जन्माला आले. हे भारतीय साहित्याच्या इतिहासातील एक अविस्मरणीय महाकाव्य ठरले. एका प्रतिभावंत महाकवीने या कादंबरीत एक अशी प्रार्थना लिहीली, जी पुढे राष्ट्राच्या जागृतीचे प्रतीक ठरली-ती लोकप्रिय प्रार्थना म्हणजे ‘वंदे मातरम्’.
या चैतन्यमय गीताचा भावार्थ मातृभूमीची आराधना आहे. खरे तर ‘वंदे मातरम् या शब्दाचा भावार्थ म्हणजे ‘आई तुला नमन’ असा साधासा असला तरी फार मौल्यवान आहे, कारण यामागे एक भावविश्व दडलेले आहे. येथे ‘माता’ सर्वांची आहे त्यामुळे तिचा आदर प्रत्येकाच्या मनात आहे. हे फक्त पृथ्वी नव्हे, तर भारतभूमीचा सजीव स्वरूपातील आविष्कार आहे. ती प्रत्येकाचे भरण पोषण करणारी आहे. म्हणूनच बंकिमचंद्रांच्या कल्पनेत रुजलेले तिचे रूप हिरव्यागार शेतीचे, खळखळ वाहणाऱ्या नद्यांचे, उंच पर्वतांचे, फुलाफळांनी नटलेल्या शेत-शिवाराचे आणि शेतात राबणाऱ्या कष्ट करणाऱ्यांच्या श्रमीकांचे योगदान आहे. ही शाश्वत दैवी शक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये वास करते. यामुळेच या गीतातील प्रत्येक ओळ मातृभूमीच्या सात्विक चैतन्यरूपाचा उत्सव साजरा करते असे मी म्हणेन.
सुजलां सुफलां मलयजशीतलां,
शस्यशामलां मातरम्!
या ओळींमधून भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचे, तिच्या संपन्नतेचे आणि दैवी गुणांचे चित्र रेखाटले आहे. होते तेव्हा एक रूप तिचं धान्यश्री आहे. तिच्या अंगावर खेळणारी वाऱ्याची सुगंधी थंड झुळूक, तिच्या मातीत रुजलेली पिके आणि सर्वांना जीवनदान देणाऱ्या पवित्र नद्या या सर्व गोष्टी अतिशय महान असल्यामुळे या भारतमातेला वंदन करण्याचे कारण बनतात.
हे गीत भावकाव्य आहे तसेच ते अाध्यात्मिक पातळीवरही सरस आहे ते असे... आपल्या अाध्यात्मामध्ये प्रार्थनेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. प्रार्थना इतरांबद्दल आदर करायला शिकवते. तद्वतच ‘वंदे मातरम्’ ही केवळ राष्ट्रभक्तीची हाक नाही; ती भक्ती आणि शक्ती या दोघांचा संगम आहे. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे स्री शक्तीला दुर्गेचे स्थान आहे आणि दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही गोष्टीचा संगम या प्रार्थनेत आहे. म्हणून भारतमातेमध्ये असलेल्या दुर्गेच्या रूपातील शक्तीला वंदन केले आहे...
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी,
कमलां कमलदलविहारिणी...
भारतीय संस्कृतीमध्ये देवी उपासनेची परंपरा अति प्राचीन काळापासून आहे. बंकिमचंद्रांनी त्या देवतेला राष्ट्रस्वरूप दिले. आपण जो धारण करतो तो धर्म. यामध्ये कर्माला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यातूनच निर्माण होतो तो आदर. मग ती आपली आई असो किंवा इतरांची, नाही तर आपली मातृभूमी या तिन्हीही सारख्याच वंदनीय आहेत....
कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्रि
पुदलवारिणीम् मातरम् ॥ २॥
वंदे मातरम्।
त्याचा भावार्थ....
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू॥
अबला कशी? महाशक्ती तू।
अतुलबलधारिणी॥ प्रणितो तुज तारिणी।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम॥ २॥
आई, तुला प्रणाम
अशा या महाशक्तिशाली भारत मातेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या भावनेतून एक नवा अाध्यात्मिक राष्ट्रवाद उदयास आला जिथे मातृभूमी ही परमदेवता ठरते आणि तिची सेवा म्हणजेच धर्म मानला गेला. यामुळेच या प्रार्थनेतील वंदे मातरम् हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील मंत्र ठरला.
तुमि विद्या, तुमि धर्म, तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे, बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति, तोमारइ प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे ॥ ३॥
मातरम् वंदे मातरम्।
खरं तर ‘वंदे मातरम्’ हे गीत म्हणजे एक सुरेल गौरवगाथा आहे असं मला वाटतं. खालील ओळींमधून याचा प्रत्यय येतो.
तू विद्या, तू धर्म। तू हृदय, तू मर्म॥
तूच प्राण अन् कुडीही। तूच माझी बाहूशक्ती॥
तूच अंतरीची भक्ती। तुझीच प्रतिमा वसे,
हर मंदिरी, मंदिरी ॥ अशा या महान माते तुला प्रणाम।
या ओळी अशा आहे की रोज याचे पारायण करावे.
१८८६ मध्ये कोलकात्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच “वंदे मातरम्” हे गीत गायले गेले आणि तेथून त्याचे रूपांतर राष्ट्रगीतात झाले. त्या काळातील क्रांतिकारक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यवीर यांच्यासाठी हे गीत प्रेरणास्थान बनले. अरविंद घोष, लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, भिकाजी कामा, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक नेत्यांनी ‘वंदे मातरम्’ला आपले घोषवाक्य बनवले. हा मंत्र म्हणत अनेक जण फासावर चढले.
रस्त्यावर इंग्रज सैनिक उभे असताना, विद्यार्थी, शेतकरी, स्त्रिया सगळ्यांच्या ओठातून उत्स्फूर्तपणे वंदे मातरम् हे शब्द बाहेर पडायचे आणि त्यामुळे सर्वांना स्फूर्ती निर्माण व्हायची. या मंत्राच्या उच्चारात असे तेज होते की इंग्रज सरकारने ‘वंदे मातरम्’ म्हणणाऱ्या लोकांवर बंदी आणली होती.
हे प्रार्थनागीत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाचे संगीतमय स्फूर्तीकाव्य होते. प्रत्येक आंदोलन, प्रत्येक सत्याग्रह, प्रत्येक बलिदानाच्या क्षणी हे दोन शब्द जनतेला पुनःश्च प्रेरित करीत. आणखी एक गोष्ट ही प्रार्थना इतके प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे हे पुढे संगीतमय भावकाव्य प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.
१९०५ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी “वंदे मातरम्” हे गीत स्वरबद्ध केले. त्यांच्या आवाजात, त्यांच्या संगीतकलेतून हे गीत भारतातील असंख्य मनांमध्ये रुजू लागले. याच काळात बंगालच्या विभाजनाच्या विरोधात जनआंदोलन पेटले आणि ‘वंदे मातरम्’चा जयघोष बंगालपासून महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, तामिळनाडूपर्यंत पोहोचला. हे गीत गायले जाताच मातृभूमीच्या गौरवाचे पडसाद मनात उमटायचे आणि आपण या शक्तिशाली, सजीव मातृभूमीचे सूपुत्र आहोत. ही भावना निर्माण व्हायची या गीतातील राग म्हणजे राष्ट्राच्या हृदयाचा ताल आहे असे जाणवायचे म्हणून ते प्रत्येकाच्या मनामध्ये सृजनाची शक्ती ठरले.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीताचा आणि ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गीत म्हणून सन्मान दिला गेला.
शुभ्र-ज्योत्सना-पुलकित-यामिनीम्
फुल्ल-कुसुमित- द्रुमदल-शोभिनीम्
सुहासिनीं सुमधुर-भाषिणीं
सुखदां वरदां मातरम्! वंदे मातरम!
या गौरव गीतातील वरील ओळींमधून आपली संस्कृती स्री शक्तीचा आदर करायला शिकवते. ‘वंदे मातरम् हे गीत मातृभूमीच्या उपासनेतून स्त्रीशक्तीचा गौरव करते. ‘माता’ म्हणजे निर्माणकर्ती, पोषणकर्ती आणि रक्षणकर्ती हे तीनही रूप स्त्रीत्वाशी जोडलेले आहेत. भारतमातेच्या उपासनेत भारतीय समाजाने स्त्रीत्वाला दैवी स्थान दिले, जे ‘वंदे मातरम’ च्या माध्यमातून स्पष्ट होते. या गीतातील देवी म्हणजे सशक्त स्त्री हातात अस्त्रधारी, पण अंतःकरणात करुणा असलेली. ही कल्पना भारतीय समाजाला समतोल दृष्टिकोन देणारी ठरली.
आजही २१ व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत आहोत. आज अनेक चांगल्या गोष्टींकडे आणि आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे अशा वेळेला मुलांच्या मनामध्ये ‘वंदे मातरम’ गीताचा भावार्थ समजून सांगण्याची गरज आहे.
हा शक्तिशाली मंत्र उद्याचे सशक्त नागरिक घडवेल आणि ही फक्त आपल्यासाठी पृथ्वी नसून ती आपली भारत माता आहे तिचा सन्मान करण्याची आपली जबाबदारी आहे ही भावना जागृत होईल.’वंदे मातरम’ हे गीत म्हणजे त्या अखंड नात्याची आठवण आहे, जी आपल्याला सांगते, स्वतःच्या मातेला विसरू नकोस.या उद्देशाने शालेय प्रार्थनेतून, देशभक्तीच्या कार्यक्रमांतून, क्रीडा स्पर्धांपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ही वंदे मातरम या मंत्राचा अतिशय आदरपूर्वक उच्चार केला पाहिजे. जरी बदलत्या प्रवाहाबरोबर जीवनमान बदलले तरी मूल्य मात्र तीच असतात. जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, आणि अनेक राष्ट्रीय कार्यक्रम प्रसंगी जेव्हा हे गीत उच्चारले जाते, ऐकले जाते, तेव्हा प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून येतो आणि पुढेही येईल.
‘वंदे मातरम्’