Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या साखळी अपघाताने संपूर्ण शहर हादरले. काही क्षणांतच दोन कंटेनर आणि एका कारचा भीषण अपघात झाला आणि आठ जण जळून मृत्युमुखी पडले. सुमारे २० जण जखमी झाले. काळोखात उजळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि विखुरलेली वाहने पाहून उपस्थितांची पावले थरथरली. अपघातानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ फिरू लागला ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या व्हिडिओमध्ये अपघातस्थळी पडलेले रोख पैसे आणि सोन्यासारख्या वाटणाऱ्या वस्तू गोळा करण्यासाठी काही लोक धाव घेताना दिसत आहेत. जीव गेलेल्या व्यक्तींच्या वस्तूंची अशी लूटमार होत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केले आहे. “ही घटना मानवतेला कलंक लावणारी आहे,” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या जात आहेत.
View this post on Instagram
नवले पुलाजवळ कंटेनरचा ताबा सुटल्याने त्याने समोरच्या आठ ते दहा वाहनांना जोरदार धडक दिली. एका कारचा अक्षरशः चुराडा झाला व तिने पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जण जळून मृत्युमुखी पडले. मृतांच्या अंगावरील दागिन्यांचे तुकडे किंवा रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्याच्या व्हिडिओने हृदय पिळवटून टाकले असून पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बोगद्याकडून उतारावरून वेगाने येत असलेल्या कंटेनरचे अचानक ब्रेक निकामी झाले. वाहनचालकाचा ताबा सुटताच कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली.
धडकेनंतर एका ट्रॅव्हलर बसला जोरदार धक्का देऊन ती पलटी झाली. या बसमध्ये १८–२० प्रवासी होते. याचदरम्यान कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि क्षणात धूराचे लोट आकाशाला भिडले.






