मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर अधिकृत झाली आहे. राजस्थानचा कर्णधार आणि महत्त्वाचा खेळाडू संजू सॅमसन आता १८ कोटी रुपयांच्या करारासह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. त्याच्या बदल्यात गेली अनेक वर्षे सीएसकेचा आधारस्तंभ असलेला रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
मात्र जडेजासाठी ही डील काहीशी घाट्यात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण चेन्नईने गट हंगामात त्याला १८ कोटींमध्ये रिटेन केलं होतं, पण राजस्थानकडून त्याला आता फक्त १४ कोटी रुपयांचा करार मिळणार आहे. पगार घटल्यानंतर तो राजस्थानचा नेतृत्वभार स्वीकारणार का?, हा प्रश्न सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
जडेजाचा राजस्थानशी जुना संबंधही खास आहे. २००८ च्या पहिल्या आयपीएल हंगामात त्याने याच फ्रेंचाईजीकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तब्बल १२ हंगाम तो सीएसकेच्या रंगात झळकला आणि आता पुन्हा आपल्या पहिल्या संघाकडे परत येतो आहे. जडेजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २५४ सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी हा मोठा टप्पा ठरणार आहे. राजस्थानचा मुख्य खेळाडू आणि कर्णधार असलेल्या संजूनं १७७ आयपीएल सामने खेळले आहेत. आता तो १८ कोटींचा करार घेऊन पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत उतरतो आहे. आयपीएलमध्ये हा त्याचा तिसरा फ्रेंचाईजी अनुभव असेल. राजस्थानशिवाय तो २०१६ आणि २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठीही खेळला होता.






