वार्तापत्र : विदर्भ
एखाद्या परिसरातील लोकनेता जर कल्पक असला, तर त्या परिसराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय उपपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी. २०१४ मध्ये गडकरी नागपूरचे खासदार झाले आणि त्यांनी इतर विकासकामांसोबत नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजित करायला सुरुवात केली. यंदा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव ८ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला असून १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. नागपूरच्या ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या प्रचंड मोठ्या मैदानावर हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील आयोजित करण्यात आला आहे.
८ नोव्हेंबरला या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय आयोजक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चाणक्य मालिकेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती घरोघरी पोहोचवणारे लेखक दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, राज्यमंत्री आशीष जयस्वाल असे सर्वच मान्यवर उपस्थित होते. मनुष्याचे जीवन उत्सवमय असावे असे भारतीय परंपरेचे विधान आहे. उत्सव हे आनंदाची अभिव्यक्ती असतात. परब्रह्म तत्त्व स्वरूप हे देखील आनंद स्वरूपच आहे. आपल्या परंपरेचे विश्वाच्या मूळ तत्त्वातही आनंद मानले आहे. परंतु रोजीरोटीच्या यांत्रिक जगात त्याला हरवून बसलो आहोत. त्यामुळे मनुष्याने अंतर्मनात डोकावून आनंदाची अभिव्यक्ती जागृत राहण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी केले. खासदार महोत्सव हा संस्कार यज्ञ आहे असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले, तर कलेशिवाय ईश्वरही अपूर्ण आहे, त्यामुळे ईश्वराच्या भक्तीबरोबरच कलेची साधना ही देखील महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी यावेळी केले. उद्घाटन समारोहानंतर प्रसिद्ध अभिनेते अशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक हमारे रामची प्रस्तुती करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी ८ नोव्हेंबरला विशाल मिश्रांच्या सुमधुर गीतांनी नागपूरकर अक्षरशः बेधुंद झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी नागपुरात होत असलेला सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल उपहार असल्याचे मत व्यक्त केले. या आयोजनासाठी त्यांनी नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना पुढे असे कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर नागपुरात एक लाख क्षमतेचे स्टेडियम उभारले जावेत अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केली.
खासदार महोत्सवाच्या निमित्ताने सकाळच्या वेळी गडकरी जागर भक्तीचा या शीर्षकाखाली विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबरला सकाळी नागपुरातील विविध शाळांमधील ५३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे याच मैदानावर उभे राहून सामूहिक गीता पठण केले. हा सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. तिसऱ्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबरला सकाळी याच मैदानावर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठण केले. यावेळी संस्कार भारतीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष कांचन गडकरी भगवताचार्य स्वामी सूर्य नंदजी महाराज स्वामी सूर्यानंद महाराज विश्व हिंदू परिषदेचे निलोत्पाल गुप्ता उपस्थित होते. संध्याकाळी प्रख्यात कलावंतांच्या वाद्यांचे वाद्य फ्युजन सादर करण्यात आले. यावेळी प्रख्यात बासरी वादक रोणू मुजुमदार, गौतम शर्मा ड्रम वादक, निलेश मोरे संगीतकार, अतुल रनिंगा बेस गिटार वादक, मनीष कुलकर्णी सितार वादक, स्वीकार कट्टी व्हायोलिन वादक, मैसूर मंजुनाथ विक्रम घोष यांनी पॉप आणि रॉक तबलावादन आणि तौफिक कुरेशी यांची तालवाद्य यांची अनोखी जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळाली. सोमवार हा भगवान शिवाचा वार त्यामुळे सोमवारी सकाळी ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवमहिमाचे धीर गंभीर स्वर जनसामान्यांना ऐकायला मिळाले. कण्वाश्रमाच्या भगिनींच्या सुरात सूर मिसळत शेकडोंच्या उपस्थितीत महिला आणि पुरुषांनी एका सुरात स्तोत्रपठण केले. शेवटी शिवशंकराची आरती देखील करण्यात आली. यावेळी देखील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. संध्याकाळी राष्ट्रसंतांची जीवनगाथा हे महानाट्य सादर करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या महानाट्यात जवळजवळ बाराशे कलावंत सहभागी झाले होते. उपस्थित आणि मोठ्या संख्येत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
मंगळवार हा श्री गणेशाचा वार म्हणून मानला जातो. त्यानिमित्ताने मंगळवारी सकाळी बुद्धीचे आराध्य दैवत श्री गणेशाची आराधना करणाऱ्या गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने या मैदानात करण्यात आली. यावेळी संस्कार भारतीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष कांचन गडकरी खासदार, खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष अनिल सोले, राष्ट्रसेविका समितीच्या मनीषा संत उपस्थित होते. संध्याकाळी याच मैदानात महाराष्ट्राची हास्य जत्रा या दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातील कलावंतांनी उपस्थित नागरिकांना हसवले. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर यांनी वऱ्हाडी भाषेत आपल्या संचालनाचा प्रारंभ केला. यावेळी नितीन गडकरी, कांचन गडकरी, माहिती आयुक्त गजानन निमदेव, पत्रकार श्रीपाद अपराजित असे मान्यवर उपस्थित होते. बुधवारी सकाळी हरिपाठ पठणाने जागर भक्तीचा हा कार्यक्रम जागवला गेला. हजारो नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवला. संध्याकाळी अखिल सचदेवने आपल्या सुरेल गाण्यांच्या तालावर उपस्थित तरुणाईला अक्षरशः थिरकवले.चार दिवसांपूर्वीच आपल्याला कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतरचा माझा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. त्यामुळे हा कार्यक्रम मी मुलीला समर्पित करीत आहे असे अखिल सचदेवाने यावेळी जाहीर केले. गुरुवार हा शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा दिवस मानला जातो. त्यामुळे जागर भक्तीचा या कार्यक्रमात सकाळी हजारो नागरिकांनी श्री विजय ग्रंथातील एकविसाव्या अध्यायाचे सामूहिक पारायण केले. संध्याकाळी संस्कार भारतीने सादर केलेल्या मिट्टी के रंग या कार्यक्रमात अकराशे स्थानिक कलावंत सहभागी झाले होते. स्थानिक कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना केले. शुक्रवारी सकाळी सामूहिक विष्णुसहस्रनामाचे पठण करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवला.आज म्हणजे शनिवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी १६ नोव्हेंबर रोजी श्रेया घोषाल यांची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी शंकर महादेवन यांनी गायलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांघिक गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे, तर १८ नोव्हेंबरला अजय अतुल यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सव हे नागपूरचे एक प्रमुख आकर्षण बनलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक तर मोठ्या संख्येत हजेरी लावतातच. मात्र बाहेरच्या नागरिकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरला आहे.
- अविनाश पाठक






