भालचंद्र कुबल : पाचवा वेद
मागच्या लेखावरून पुढे जाताना दिग्दर्शक हा नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेत उपेक्षितच असतो याचा प्रत्यय, बऱ्याच दिग्दर्शकांशी बोलल्यानंतर मला आला. फक्त उपेक्षेचे प्रकार वेगवेगळे असतात याचा नवा साक्षात्कार आणि माहिती उत्खननातून अभ्यासयुक्त रांजण सापडला. खरं तर मला वाटलं होतं की, ‘खोदा पहाड निकला चुहा’सारखी गत होईल, पण समोर आलेलं वास्तव, दिग्दर्शक या एलिमेंटला खतपाणी किंवा प्रोफेशनली बुस्ट करणारं नक्कीच नव्हतं. मी विजय केंकरे, राजेश देशपांडे, सतीश सलागरे, राम दौंड, सुगत उथळे, सुनील कदम आदी दिग्दर्शकांशी सविस्तर चर्चा केली आणि हाती लागलेल्या अनेक सैद्धांतिक समीकरणांचा उहापोह म्हणजे ही लेखमाला होय.
नाट्य दिग्दर्शकांचे प्रकार हे त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, दृष्टिकोन, कलात्मकतेच्या आधारावर वेगवेगळे केले जातात. दिग्दर्शक मुख्यत्वे तीन-चार प्रमुख प्रकारांमध्ये समजावले जाऊ शकतात. नाट्य दिग्दर्शकाचे ढोबळ स्वरूपाने विचारात घ्यावेत असे काही प्रकार. सर्व प्रथम साहित्यप्रधान दिग्दर्शक. हे दिग्दर्शक नाट्यसंहितेच्या (script) अर्थ, भाष्य आणि भावनांचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने विचार करतात. त्यांच्या दिग्दर्शनात लेखनाच्या अर्थाचा प्रभाव अधिक असतो. संवाद, परिस्थिती व कथानक यावर लक्ष केंद्रित होते. दुसरा प्रकार अभिनयप्रधान दिग्दर्शक. असा दिग्दर्शक की जो नट-नटीच्या शरीराच्या, आवाजाच्या, हावभावाच्या वापराला आणि अभिनय कौशल्याला अग्रक्रम देतो. नटांच्या सजीवतेवर आणि कृतीवर लक्ष अधिक केंद्रित असते. तिसरा दृश्यप्रधान दिग्दर्शक. येथे नेपथ्य, प्रकाशयोजना, रंग योजना, वेशभूषा, साउंड, इ. दृश्य-सांगीतिक (visual-aesthetic) घटक दिग्दर्शकाच्या शैलीत वैशिष्ट्य ठरतात. नाट्याचा रंगमंचावरचा अभिजात देखावा, दृश्यातील ताकद आणि सौंदर्य समोर येते. संपूर्ण/समन्वयक दिग्दर्शक... हा सर्व घटकांचा समन्वय साधतो; म्हणजे साहित्य, अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाश, रंगभूषा-या सर्वांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना मिळवून देतो. इतर विशेष शैली किंवा प्रकार म्हणजे प्रयोगशील दिग्दर्शक. वेगळ्या, अपारंपरिक शैली व तंत्रांचा वापर, नवे प्रयोग, नवे रंगभूषाकार तंत्र अवलंबणारे दिग्दर्शक. संगीतप्रधान दिग्दर्शक, हा नाट्यप्रयोगातील संगीताचा वापर, गायनाची मांडणी यावर भर देतो. मराठी संगीत नाटकांच्या परंपरेत हा प्रकार महत्त्वाचा ठरतो. हे प्रकार एकमेकांपासून पूर्ण वेगळे असतात असे नाही. अनेक दिग्दर्शकांमध्ये दोन किंवा अधिक प्रकारांची वैशिष्ट्ये एकत्रितपणे कार्य करताना आढळतात. हा अभ्यास अर्थातच आजवर आम्ही नाट्यशास्त्राबरोबर शिकलेल्या दिग्दर्शकांच्या प्रकारात मोडत नाही. आजवर अभ्यासक्रमाप्रमाणे शिकवले जाणारे दिग्दर्शकांचे प्रकार म्हणजे, तालिम मास्तर दिग्दर्शक, रबरस्टँप दिग्दर्शक, सर्जनशील दिग्दर्शक, हुकूमशहा दिग्दर्शक, लेखक दिग्दर्शक व नट दिग्दर्शक असे ५-६ प्रकार विचारात घेतले जायचे; परंतु अभ्यास जरी सूक्ष्म होत गेला असला तरी परिस्थिती अद्याप बदललेली नाही. दिग्दर्शक उपेक्षित तो उपेक्षितच राहिला. नाटक संपल्यावर प्रेक्षक अगदी आवर्जून नटांची, गायकांची भेट घ्यायला बॅकस्टेजला येतात. दिग्दर्शक कोपऱ्यात उभा राहून अभिवादन स्वीकारणाऱ्या नट-नट्यांकडे कृतकृत्य भावनेने पाहत असतो. मग एखाद्या सी ग्रेड नटाचे लक्ष जाते, आणि भेटायला आलेल्याना तो म्हणतो "हे आमचे दिग्दर्शक बरं का...!"
हीच ती उपेक्षा. म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेत राम दौंड यांनी ५२ नाटकं सादर केली. कैक नाटकं केंद्रातून पहिली सुद्धा आली पण मग हाती काय लागलं? तर काहीही नाही. अशोक मा. मा. या मालिकेतील महत्त्वाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली; परंतु दिग्दर्शक म्हणून करिअर होऊच शकलं नाही; सुनील कदम, सुगत उथळे आदी राज्यनाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक सरकारी नोकरी असल्यामुळे करिअर नामक स्थैर्य मिळवून देणाऱ्या मुद्याशी फारकत घेऊन दरवर्षी नित्यनियमाने नाटकं करत राहिले. बँका, बीईएसटी, एमएससीबी, पोर्ट ट्रस्ट, मंत्रालय, शासकीय मुद्रणालय आदी शासकीय संस्थातून नाटके दिग्दर्शित करत अनेकांनी आपले खिसे देखील रिकामे केले. अगदी अमोल पालेकर, राजन ताम्हाणे, अरुण नलावडे, अविनाश नारकर अशा अनेकांनी नाटके दिग्दर्शित करण्याऐवजी अभिनयावर जोर दिला. ही मंडळी प्रेक्षकांना सातत्याने ‘दिसत’ राहिली आणि त्यामुळे त्यांच्याभोवती असलेले प्रसिद्धीचे वलय दिग्दर्शक म्हणून न राहता अभिनेत्याच्या बाजूचे जास्त आहे. सतिश सलागरे यांनी अतिशय गंमतीदार उदाहरण दिले. एका राज्यनाट्य स्पर्धेत यश मिळाल्यावर स्वतः गंगाराम गवाणकर त्यांना कलावैभवचे निर्माते मोहन तोंडवळकरांकडे घेऊन गेले होते. पुढे दोन नाटके सतिश सलागरे यांनी दिग्दर्शित केलीदेखील; परंतु त्यांना व्यावसायिक यश न मिळाल्याने दिग्दर्शक म्हणून नाट्यसृष्टीतील स्थैर्य काही मिळू शकलं नाही. विजय केंकरे यांची दिग्दर्शकीय कारकीर्द, तर सिनेमॅटीक आहे, नशीब यावर ते पुस्तक लिहितायत. एका प्रतिथयश दिग्दर्शकाच्या मुलाला राज्यनाट्य स्पर्धेत ‘ऑथेल्लो’ पहिलं आल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवेश अत्यंत सोप्पा होता. वडिलांच्या हातात धी गोवा हिंदू असोसिएशन आणि मुंबई मराठी साहित्य संघ सारख्या बलाढ्य नाट्यसंस्था पाठीशी उभ्या होत्या. आॅथेल्लो १९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं आलं आणि विजय केंकरे पहिले हिट नाटक १९९२ साली ‘बिघडले स्वर्गाचे दार’ या नावाचे ठरले. प्रत्येक दिग्दर्शकाने स्पर्धेत आपले कर्तृत्व सिद्ध केल्यानंतरचा जो उमेदवारीचा काळ भोगावा लागतो त्याला मी त्या दिग्दर्शकाची उपेक्षा म्हणतो. चंद्रकांत कुलकर्णींची उपेक्षा मी स्वतः पाहिलीय, मी पौगंड पाहिलंय, मी आरण्यक, सती या एकांकिकांसाठी बॅकस्टेज केलंय. करिअर घडवण्यासाठी केलेलं स्ट्रगल पाहिलंय. स्वतःला दिग्दर्शक म्हणून सिद्ध करण्याचा काळ स्ट्रगलिंगपेक्षा भयावह असतो. राजेश देशपांडे, संतोष पवार, पुरुषोत्तम बेर्डे, प्रकाश बुद्धीसागर, हेमंत भालेकर, यांच्या स्ट्रगलिंगच्या गोष्टी, तर दिग्दर्शकीय सिद्धांत बनून जातील इतक्या इंटरेस्टिंग आहेत, तर सुनील कदम, बुद्धदास कदम, समीर पेणकर, प्रमोद शेलार, गजानन चव्हाण, प्रमोद सुर्वे, राजू वेंगुर्लेकर असे अनेक हौशी रंगभूमीवरील दिग्दर्शक एकत्र आणल्यास एक नाट्याभ्यास तयार होऊ शकतो. अभिजित झुंजाररावचे ‘सखाराम बाईंडर’ रंगभूमीवर आलंय आणि उपेक्षेने हैराण झालेला एक सृजनशील दिग्दर्शक प्रकाशझोतात आलाय. या निमित्ताने प्रत्येकाशी बरंच काही बोललोय आणि बऱ्याच दिग्दर्शकांशी बोलून यावर एक ठोस अशी उपेक्षिततेची कारणमिमांसा तयार करण्याच्या प्रक्रियेला लागलोय. बघू किती यश मिळते ते..! (सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक आहेत.)






