Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मंत्री चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
जेडीयूने या निवडणुकीत ८५ जागा मिळवत मोठे यश मिळवले, तर चिराग पासवान यांच्या एलजेपीला १९ जागा प्राप्त झाल्या. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. नितीश कुमार यांच्यासोबतच्या भेटीचे काही क्षण चिराग पासवान यांनी “एनडीएच्या प्रचंड विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली,” एक्सवर शेअर करत माहिती दिली.
पासवान म्हणाले की, बिहारच्या लोकांनी योग्य वेळेत योग्य निर्णय घेत देशाला संदेश दिला आहे. हा विजय कोणत्याही एका पक्षाचा नसून बिहारच्या नागरिकांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या प्रगल्भतेचा आहे. लोक जनशक्ती पक्षाने ज्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, असे ते म्हणाले. एनडीएच्या सरकारमध्ये बिहारच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि राज्यातील तरुण, महिला तसेच मागासवर्गीयांसाठी विशेष काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारले असता पासवान म्हणाले की, अमित शहा यांनी स्पष्ट केले होते की मुख्यमंत्रीपदाची निवड विधिमंडळ पक्ष करणार आहे. त्यांची स्वतःची इच्छा नितीश कुमार यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी असल्याचेही त्यांनी म्हटले. २०२० मधील पराभवाचा संदर्भ देताना त्यांनी म्हटले की, त्या वेळी त्यांच्या पक्षाच्या अपयशासाठी अनेक जण जबाबदार होते आणि जेडीयूशी मतभेद असल्याच्या अफवा मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या.






