मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या तीनही दिवसात हे कला प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मुंबईतील निसर्गसौंदर्याचे अभ्यासक, जाणकार आणि निरनिराळ्या कलांची आवड जोपासणाऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन हे अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. या प्रदर्शनात जपानी संस्कृतीतील सूक्ष्म व संयमशील कलांचे दर्शन मुंबईकरांना घडणार आहे. या कला प्रदर्शनासाठी बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो-जॅपनिज असोसिएशन व ओरिगामी मित्र यांचे सहकार्य लाभणार आहे.
‘बोन्साय’ या लघुवृक्ष संवर्धन कलेसोबतच ‘ओरिगामी’ म्हणजेच कागदाच्या घड्या घालून नवनवीन कलाकृती साकारण्याची पारंपरिक जपानी कला या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे. मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन म्हणजे निसर्ग आणि कलेचा एकत्र उत्सव ठरणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.