Friday, November 14, 2025

बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस-उबाठा सेनेत कलगीतुरा

बिहारच्या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस-उबाठा सेनेत कलगीतुरा

अंबादास दानवे यांच्या टीकेला भाई जगताप यांचे प्रत्त्युतर

मुंबई  : मतमोजणीदरम्यान बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार याचे चित्र स्पष्ट होताच महाराष्ट्रातील मविआतील खदखद बाहेर पडली. ‘काँग्रेसने आता वृत्ती बदलावी’, असे म्हणत उबाठा सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सुनावले. दानवे यांनी पराभवाचे खापर काँग्रेसवरच फोडले. त्यामुळे काँग्रेसमधून याला उत्तर देण्यात आले. ‘शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकावल्या', असे म्हणत काँग्रेसचे भाई जगतापही भडकले.

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा दारुण पराभव झाला. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मोठी कामगिरी करण्यात अपयश आले. काँग्रेसही फार यश मिळवू शकलेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवत उबाठा सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

‘पराभव झाला हे मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला खूप उशीर झाला. काँग्रेसचे असेच आहे. जागावाटपात काँग्रेसला मोठा वाटा हवा असतो. प्रत्यक्षात विजयाचे प्रमाण कमी आहे. काँग्रेसच्या या वृत्तीमुळेच मित्रपक्षांचे नुकसान होत आहे, असे दानवे म्हणाले.

महाराष्ट्रात केलेली चूक, बिहारमध्येही केली

विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला असता आणि जागावाटप आधी केले असते, तर राज्यात वेगळे चित्र असते. जी चूक महाराष्ट्रात झाली, तीच बिहारमध्येही केली. काँग्रेसने आता वृत्ती बदलली पाहिजे, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी सुनावले.

मविआतील दोन्ही पक्षात ठिणगी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मविआमधील दोन पक्षांची एकमेकांबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लागलेल्या असतानाच ही ठिणगी पडली आहे. महाविकास आघाडीत एकत्र लढण्याचा सूर असताना सुरू झालेला हा वाद वाढणार की शमणार? यावर आघाडीच्या एकीचे भवितव्य ठरणार आहे.

भाई जगताप यांचे दानवेंना उत्तर :

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप म्हणाले, अंबादास दानवे खूप विद्वान आहेत. दानवे विरोधी पक्षनेते राहिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा, लोकसभा हे वेगवेगळे विषय आहेत. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना मुंबईला धरून मत मांडले की, काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजेत. आजही माझे तेच मत आहे. आमच्या नेत्यांचे काय मत आहे, ते आम्ही मान्य करू. भायखळामध्ये शिवसेना कधीच जिंकली नव्हती. वांद्रे पूर्वमध्ये एकदाच शिवसेना जिंकली होती. शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकावल्या आहेत.

Comments
Add Comment