मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी सुरू झाली आहे. पूर्वचाचणीमध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी १० नोव्हेंबर, २०२५ ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येत आहे. पूर्वचाचणी अंतर्गत स्व-गणना करण्याचा पर्यायही १ नोव्हेंबर, २०२५ ते ७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आला होता.
जनगणना २०२७ ही पूर्णतः डिजिटल माध्यमातून करण्याची सुरूवात झाली आहे. या पूर्वचाचणीमध्ये घरयादी व घरगणना या पहिल्या टप्यातील मध्ये पर्यवेक्षकाद्वारे प्रत्येक घरयादी गटाची चतुःसीमा डिएलएम ऍपच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. या चतुःसीमेच्या आत येणा-या सर्व इमारती, घरांची गणना आणि कुटुंबाची माहिती प्रगणकाद्वारे एचएलओ ऍप द्वारे संकलित करण्यात येणार आहे. तसेच सीएमएमएस पोर्टर अर्थात सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरींग सिस्टीमद्वारे क्षेत्रीय कामाचे व्यवस्थापन व देखरेख होणार आहे. जनगणना पूर्वचाचणीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम विभागामधील १४२ घरयादी गट तयार करण्यात आले आहेत. या पूर्वचाचणीसाठी एकूण १३५ प्रगणक व २२ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पूर्वचाचणीसाठी प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण ६ ते ८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.
एम पश्चिम विभाग अंतर्गत १० नोव्हेंबर २०२५ पासून पूर्वचाचणीचे क्षेत्रीय काम सुरु झाले आहे. या कामकाजाचा आढावा घेणारी बैठक महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे, उप महानिबंधक श्री. ए. एन. राजीव, महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य( अधिकारी (शहर जनगणना अधिकारी) डॉ. दक्षा शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या पूर्वचाचणीच्या निमित्ताने प्रत्यक्षात घरयादी गटामध्ये भेट देण्यात आली. तसेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीदरम्यान पूर्वचाचणीचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश देण्यात आले.