सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. विषय कोणताही असो, हे सेलिब्रिटी (Celebrity) आपलं स्पष्ट आणि रोखठोक मत मांडताना मागेपुढे पाहत नाहीत. यापैकीच एक नाव म्हणजे, चिन्मयी सुमित. समाजिक विषयांवर अनेकदा चिन्मयी बिनधास्तपणे आपली मतं मांडते. चिन्मयी कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर कायम आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्कार, जय भीम', असं बोलून करते. त्यामुळे अनेकदा तिला तुमचा नक्की धर्म कोणता? तुम्ही जय भीमवाल्या आहात का? तुम्ही त्यांच्यातल्या आहात का? अशी विचारणाही झाल्याचं तिनं सांगितलंय. अशातच या सर्वांना अगदी बिनधास्तपणे, "मी त्यांच्यातलीच आहे...", असं उत्तर अभिमानानं देत असल्याचंही चिन्मयी सुमितनं सांगितंलय.
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात अखिल भारतीय जनवादी संघटनेच्या वतीनं १३ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं. या अधिवेशनात बोलताना चिन्मयी सुमित म्हणाली की, "नेहमी नमस्कार केल्यानंतर मी जय भीम म्हणते, त्यामुळे मला खूप जण विचारतात की, तुम्ही जय भीमवाल्या आहात का? तुम्ही त्यांच्यातल्या आहात का? तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, मी त्यांच्यातली आहे... मी आंबेडकरांची आहे... लोक वेगवेगळ्या जणांचे फॅन्स असतात, तशी मी आंबेडकरांची फॅन आहे... मला असं वाटतं की, भारताल्या प्रत्येक भगिनीला जय भीम म्हणावसं वाटलं पाहिजे..."
महिला संघटना चालवणारे लोक , समानतेवर आधारित समाज असावा असं स्वप्न पाहणारे लोक किंवा महिला या प्रथम माणूस आहेत याची आठवण करून देणारी ही संघटना आहे. त्यामुळे मला वाटतं की आपल्या सर्वांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटनाकार म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता ही माझ्या प्रत्येक नमस्कार नंतर व्यक्त व्हावी म्हणून मी नेहमी जय भीम म्हणते. दरम्यान, चिन्मयीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, आजवर तिनं अनेक मालिका आणि सिनेमांमधून महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात.






