Friday, November 14, 2025

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांचे ९७व्या वर्षी निधन झाले. अलीकडेच त्या आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा मध्ये आणि कबीर सिंहमध्ये शाहिद कपूरच्या आजीच्या भूमिकेत झळकल्या होत्या.

कामिनी कौशल या १९४० च्या दशकातील अत्यंत प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक होत्या. १९४७ आणि १९४८ या सलग दोन वर्षांमध्ये बॉक्स ऑफिस इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये त्या पहिल्या क्रमांकावर होत्या. २०२२ मध्ये आउटलुक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या ‘७५ सर्वोत्तम अभिनेत्रींच्या यादीतही त्यांना मानाचा दर्जा मिळाला.

कामिनी कौशल यांचा जन्म १६ जानेवारी १९२७ रोजी लाहोर येथे झाला. त्यांनी अगदी लहान वयात ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पूर्ण केल्यानंतर, १९४६ मध्ये चेतन आनंद यांनी नीचा नगरमधून त्यांना हिंदी चित्रपटांत पदार्पणाची संधी दिली.

करिअरच्या कालावधीत दो भाई, नदिया के पार, जिद्दी, शबनम, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपड़ा और मकानसह अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी दिलीप कुमार, राज कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही पडद्यावर काम केले होते.

कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला वेगळे वळण लागले. आपल्या बहिणीच्या निधनानंतर तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी १९४८ मध्ये मेहुणे बी.एस. सूद यांच्याशी विवाह केला.

शहीद (१९४८) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कामिनी कौशल आणि दिलीप कुमार यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. दिलीप कुमार यांना त्यांच्याशी विवाह करायची इच्छा होती, पण दोन्ही कुटुंबांच्या विरोधामुळे हे नाते तुटले.

धर्मेंद्र यांच्या पहिल्या को-स्टार

धर्मेंद्र यांचा चित्रपट ‘शहीद’ मध्ये कामिनी कौशल त्यांच्या पहिल्या को-स्टार होत्या. धर्मेंद्र यांनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून, “माझ्या आयुष्यातील पहिला चित्रपट शहीद ची हिरोईन कामिनी कौशल यांची पहिली भेट… दोघांच्या चेहऱ्यावर हसू… एक प्रेमळ ओळख” असे लिहिले होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा