Thursday, November 13, 2025

मराठवाड्यात हुडहुडी वाढली...!

मराठवाड्यात हुडहुडी वाढली...!

वार्तापत्र : मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसू लागतात. त्याचप्रमाणे मराठवाड्यातदेखील चांगलीच हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी आता हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. 

राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी हुडहुडी वाढली आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ८ अंशांची मोठी घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे. राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. उत्तरेकडे थंडी कायम राहण्याची तर दक्षिणेकडे किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाडा व विदर्भात तापमानात चांगलीच घट झाली आहे. मराठवाडा व विदर्भाची सीमा एकमेकांच्या लगत आहेत. यंदा विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यात जास्त थंडी जाणवत आहे. या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात थंडी सौम्य आहे. कोकणाच्या तुलनेने यंदा पश्चिम महाराष्ट्रातील थंडी कमी जाणवत आहे, असे त्या भागात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. या आठवड्यात पुणे, मुंबई, नाशिक, सातारा या भागात किमान तापमान १२ ते १६ अंश सेल्सीएसच्या दरम्यान नोंदविण्यात आले. हवामान विभागाने देखील मराठवाड्यातील काही जिल्ह्याच्या बाबतीत अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत. त्यापैकी परभणी जिल्ह्यात नेहमीच उष्णता व थंडीचे प्रमाणही जास्त असते. राज्यात तापमानात घसरण झाल्याने महाबळेश्वरसारखी थंडी जळगावमध्ये अनुभवास येत आहे. मागच्या वर्षी हिवाळा ऋतूत सुरुवातीलाच मराठवाड्यातील परभणी येथे पारा चांगलाच घसरला होता; परंतु सध्या जळगावचे तापमान १० अंश सेल्सीएसवर आले आहे. उत्तर भारतात गारठा वाढल्याने त्याचा परिणाम मराठवाड्यात चांगलाच दिसून येत आहे. आता येत्या काही दिवसांत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अशाच प्रकारे थंडी वाढणार आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असल्याने महाराष्ट्रातील हवामान बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई तसेच कोकणात दरवर्षीपेक्षा कमी थंडी राहण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

सातारा, महाबळेश्वर या भागात १६ अंश सेल्सीएसपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या तीन जिल्ह्यांत किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड, लातूर या ठिकाणीही थंडीचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात १३ अंश सेल्सीएसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकचा पारा १२ अंश सेल्सीएसवर आला आहे. पुण्यात नेहमीच थंडगार वातावरण असते. त्या ठिकाणी तापमानाची नोंद १६ अंश सेल्सीएस एवढी नोंदविण्यात आली. असाच काहीसा अनुभव मराठवाड्यात जाणवत आहे. उत्तर भारतातील हवामान जोपर्यंत स्थिर होणार नाही, तोपर्यंत मराठवाड्यातील वातावरणात असाच गारवा राहील, असे हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. मराठवाड्यातील वातावरणात बदल दिसून आल्यानंतर सर्दी, ताप, खोकला हे आजार दिसून येत आहेत. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना सर्दी व खोकल्याचा आजार झाल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातही थंडीचा जोर वाढल्याने शेकोट्या पेटविल्या जात आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतात असलेले पीक काढण्यात आल्यानंतर शेतकरी थोडासा निवांत झाला आहे. यंदा मराठवाड्यात सर्वत्रच अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातातील पिके वाया गेली. यंदा पावसाळा मोठा होता. त्यामुळे थंडी देखील जास्त राहील असा अंदाज मराठवाड्यातील वयोवृद्ध व जाणकार लोकांकडून काढण्यात आला होता. मराठवाड्यातील ग्रामीण भागात ऋतुचक्र बदलले असल्याने शेतात पीक घेत असताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. मराठवाड्यात आता तर थंडीचा जोर वाढल्याने अशा रब्बीच्या वातावरणात कुठली पिके घ्यावीत, याबाबत शेतकरी देखील मार्गदर्शन घेत आहेत. उत्तर भारतातील वातावरणावर मराठवाड्यात होत असलेल्या वातावरणातील बदल लक्षात घेतला जातो. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. ऐन थंडी काळात निवडणुका होणार असल्याने या वातावरणाचा प्रचार, सभा, निवडणूक, मतदान, मतमोजणी यावर नक्कीच परिणाम होणार आहे. एकीकडे वातावरणातील गारवा व दुसरीकडे राजकारणातील गर्मी असे चित्र काही दिवसांत मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाहावयास मिळणार आहे.

दरम्यान हुडहुडी वाढल्याने आरोग्यविषयक प्रश्न देखील निर्माण होत आहेत. थंडीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. थंडीच्या या काळात हातमोजे, स्वेटर, मफलर, कानपट्टीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. अनेकांनी कपाटात बंद केलेले हे सर्व साहित्य बाहेर काढले आहे. यंदा थंडी दरवर्षीपेक्षा जास्तच राहणार आहे. त्यामुळे थंडीच्या लाटा लक्षात घेऊन घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. सकाळी दररोज पायपीट करणारी मंडळी देखील थंडीमुळे उशिरा घराबाहेर पडत आहेत. एकंदरित ही थंडी वाढतच जाणार असल्याने सकाळी १५ अंश सेल्सीएसपेक्षा जास्त तापमान झाल्यानंतरच घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य राहील, असा सल्ला डॉक्टर मंडळींकडून दिला जात आहे. शेवटी प्रत्येकाच्या आरोग्यावर थंडीचा वेगवेगळा परिणाम होत असतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला तसेच शरीराला मानवणारी थंडी याचा विचार करूनच प्रत्येकाने घराबाहेर पडावे, असेही आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. दरम्यान मराठवाड्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किमान उष्णतेचा पारा नसल्याचा फायदा प्रचारासाठी नक्कीच होणार आहे. पावसाळा व अति उष्ण उन्हाळा या दोन ऋतूत प्रचार करणे थोडेसे किचकट असते; परंतु या दोन ऋतू व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये मात्र उमेदवारांना प्रचारात तेवढी अडचण येत नाही. यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगतदार तसेच उमेदवारांना विकासासाठी उष्णता देणारे ठरो, असेच यानिमित्ताने म्हणता येईल.

- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment