Friday, November 14, 2025

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ अनुभवायला मिळाला. कारण या भागात साजरा करण्यात आला होता फरहान अख्तरच्या करिअरचा २५ वर्षांचा गौरव सोहळा. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि गायक अशा विविध रूपांत त्याने बॉलिवूडमध्ये निर्माण केलेल्या ओळखीचे सेलिब्रेशन करण्यासाठी हा विशेष एपिसोड ठेवण्यात आला.

या सेलिब्रेशनसाठी फरहान अख्तरची पत्नी आणि सिंगर-होस्ट शिबानी अख्तर यांनीही मंचावर हजेरी लावली. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेताना त्यांचं लक्ष सर्वाधिक वेधून घेतलं डोंबिवलीच्या दमदार गायिका अंशिकाने. या सीझनमध्ये तिच्या नैसर्गिक गायकीने, ऊर्जा आणि स्टेजवरील आत्मविश्वासाने ती सातत्याने चर्चेत राहत आहे.

अंशिकाच्या जोशपूर्ण सादरीकरणानंतर भारावून गेलेली शिबानी म्हणाली, “रॉक ऑन पुन्हा बनवायचा झाला तर तूच होशील बँडची लीडर!” त्यांच्या या वक्तव्याने सेटवर उत्साहाचं वातावरण पसरलं. हे फक्त कौतुक होतं की रॉक ऑनच्या संभाव्य पुढील भागाचा संकेत, यावर चर्चा रंगली असली तरी अंशिकाच्या मेहनतीला मिळालेला हा मोठा सन्मान आहे.

हा एपिसोड केवळ फरहान अख्तरच्या प्रवासाचा उत्सव नव्हता, तर त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वावर टाकलेल्या प्रभावाची आठवणही करून देणारा होता. दिल चाहता है पासून रॉक ऑन!! पर्यंत, फरहानने तरुणाईच्या भावना, स्वप्नं आणि क्रिएटिव अभिव्यक्तीला नवी दिशा दिली आहे.

दरम्यान, अंशिका या सीझनमधील सर्वात उत्साही आणि ताकदवान गायिका म्हणून उदयास येत असून जज आणि सेलिब्रिटी गेस्ट सतत तिच्या प्रतिभेचे कौतुक करताना दिसत आहे. या विशेष एपिसोडमधील शिबानींच्या प्रशंसेनंतर तिच्या प्रवासाला आणखी वेग मिळेल, असे दिसते.

रॉक ऑनचा सिक्वेल होणार की नाही याची निश्चित माहिती नसली तरी, ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर अंशिकासाठी हा क्षण नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सध्याचा सीझन उत्तम टॅलेंट, मनाला भिडणारे परफॉर्मन्स आणि नव्या कलाकारांच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा देत आहे.

Comments
Add Comment