मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी वातावरण तापले आहे. माध्यमांवर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक अप्रमाणित बातम्या, व्हिडिओ आणि चुकीच्या अपडेट्स व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. काही माध्यमांनी तर त्यांच्या मृत्यूची खोटी माहितीही पसरवली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ आणि चिंतेची लाट निर्माण झाली.
या वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) अध्यक्ष अशोक पंडित यांनी काही पापाराझी आणि डिजिटल मीडिया हँडलर्सविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांना दिलेल्या पत्रात त्यांनी माध्यमांच्या बेजबाबदार वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काही मीडिया प्रतिनिधींनी धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाच्या आवारात परवानगीशिवाय प्रवेश केला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे व्हिडिओ चित्रीत केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर "सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी" प्रसारित करण्यात आले, असा आरोप तक्रारीत आहे.
अशोक पंडित यांनी या घटनेला “अमानवी, अनैतिक आणि भारतीय संविधानातील कलम २१ अंतर्गत हमी दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचे सरळ उल्लंघन” केले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोलिसांना विनंती केली आहे की अशा गैरजबाबदार वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटनांवर अंकुश ठेवावा.
या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






