पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी, १४ नोव्हेंबर हा दिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू हे असे नेते होते ज्यांनी मुलांवर खूप प्रेम केले. मुलं ही भारताचे उज्ज्वल भविष्य असल्याचे त्यांचे ठाम मत होते. म्हणून या मुलांचे पालन-पोषण, त्यांच्यावर होणारे संस्कार यावर त्यांचा अधिक विश्वास असे. बालदिन म्हटलं की, देशातील, प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हा दिवस चिमुकल्यांबरोबर साजरा केला जातो. प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्या हास्यातली ती चमक बरंच काही सांगते. अनके उद्याने या बालकांसाठी विविध रंगांनी भरलेली असतात. या वातावरणात या मुलांच्या बालपणाचा उत्साह साजरा करण्यासाठी प्रत्येकजण एकत्र येतात; परंतु या उत्सवांमध्येही एक शांत, जागरूक शक्ती अस्तित्वात आहे जी भारतीय रेल्वेवरील मुलांच्या निरागसतेचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास काम करते. केवळ मुलांना फुगे किंवा मिठाई देऊन या मुलांचे मनोधैर्य वाढवत नाही तर यांचे संरक्षण करण्यास ते नेहमी तत्पर असतात, ते आहे (आरपीएफ) रेल्वे संरक्षण दल, जे केवळ प्रवाशांचे आणि रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यापेक्षा या मुलांचे संरक्षण त्यांना आसरा देणारे महत्वाचे नायक ठरले आहे.
'आजची मुले उद्याचा भारत घडवतील': पंडित जवाहरलाल नेहरू
रेल्वेच्या परिसरात वावरणारी ही अनेक पोरकी मुले आहेत. आरपीएफ या मुलांसह त्यांच्या स्वप्नांचे रक्षण करतात. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात, पायऱ्यांखाली, वेटिंग रूममध्ये आणि चालत्या गाड्यांमध्ये, हजारो मुलांना या उत्सवाची माहितीही नसते. अनेकदा ही मुले तस्करीचे बळी ठरतात. कोणीतरी अत्याचार करतोय म्हणून त्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिथून पळून जाणारी मुले दुसऱ्या सापळ्यात अडकतात. स्वत:च्या पोटच्या मुलाला रेल्वे परिसरात सोडून दिलेली, हरवलेली किंवा बालमजुरीसाठी भाग पाडलेली मुले असतात ही. त्यांची निरागसताच हरवलेली असते. अशा मुलांच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य, जगण्याची ऊर्मी, एक आशा, उमेद देणारा हा बालदिन यांच्यासाठी खूप काही देणारा असतो. कोणाच्या तरी मायेची ऊब शोधणारी ही मुले यांच्यासाठी बालदिन हा उत्सव नाही, तर मदतीसाठी दिलेली हाक आहे. या आवाहनाला साथ देणारे, ही हाक ऐकणारे रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) खाकी पोशाखातील पुरुष आणि महिला आहेत.
'आरपीएफ' जिथे कर्तव्य आणि प्रेम यांचा संगम होतो. रेल्वे सुरक्षासाठी आरपीएफची ओळख आहे; परंतु अनेकांना आरपीएफ बाल संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान असल्याची माहिती नसते. अनेकदा येथील गर्दी आणि गोंधळ असलेली रेल्वे स्थानके मुलांसाठी धोकादायक क्षेत्र असतात. जिथे ते त्यांच्या कुटुंबांपासून दूर होऊ शकतात, तस्करांना बळी पडू शकतात किंवा स्वतःला संकटात टाकू शकतात. अशावेळी आरपीएफ कर्मचारी केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे येत नाहीत, तर या मुलांचे पालक, मार्गदर्शक आणि काळजीवाहक म्हणून देखील त्यांच्या पाठीशी उभे राहतात. १९५७ मध्ये स्थापन झालेले, आरपीएफ मूळत: रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली; परंतु गेल्या काही वर्षांत, देशातील रेल्वे परिसरातून प्रवास करणाऱ्या हजारो संकटग्रस्त मुलांसाठी सुरक्षा कवच ठरले आहे. या मुलांसाठी केवळ रेल्वेच सुरक्षा कवच का ठरते, तर याचे कारण कारण तस्कर, बालकामगार दलाल आणि अपहरणकर्ते अधिकाधिका रेल्वेलाच प्राधान्य देतात. ६७,००० किलोमीटरहून अधिक ट्रॅक, १२,००० हून अधिक गाड्या आणि ७,००० स्थानकांसह, भारतीय रेल्वे वाहतुकीचा एक चमत्कारिक प्रवास आहे आणि दुर्दैवाने, मुलांसाठी असुरक्षित कॉरिडॉर आहेत, येथेच आरपीएफ बाल तस्करी, बालकामगार आणि रेल्वेवरील शोषणाविरुद्ध भारताच्या पहिल्या संरक्षण रांगेत काम करते.
२०१७ मध्ये, भारतीय रेल्वेने आरपीएफ अंतर्गत ऑपरेशन नन्हे फरिश्ते नावाचा एक परिवर्तनकारी उपक्रम सुरू केला, ज्याचा शब्दशः अर्थ "छोटा फरिश्ता" असा होतो. त्याचे उद्दिष्ट रेल्वे परिसरात संकटात सापडलेल्या मुलांची सुटका करणे, पुनर्वसन करणे आणि त्यांचे संरक्षण करणे आहे. त्याच्या स्थापनेपासून, ऑपरेशन नन्हे फरिश्तेने १.६ लाखांहून अधिक मुलांची सुटका केली आहे, ज्यात हजारो मुलांचा समावेश आहे, ज्यांना मजुरी किंवा अत्याचारासाठी तस्करी करण्यात आली होती. पुनर्वसनासाठी त्यांनी चाइल्डलाइन (१०९८), जिल्हा बाल संरक्षण युनिट्स आणि स्वयंसेवी संस्थांशी भागीदारी केली आहे. प्रमुख स्थानकांवर बाल मदत केंद्रे स्थापन केली आहेत. प्रमुख स्थानकांवर, बाल मदत केंद्रे असुरक्षित मुलांसाठी आश्रयस्थान बनले आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF), पोलीस, १०९८ आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणारी ही सेवा तत्काळ निवारा, अन्न आणि वैद्यकीय सेवा, बाल संरक्षण प्रणालींशी नोंदणी, बाल कल्याण समित्यांशी संबंध आणि कायदेशीर मदत आणि हरवलेल्या मुलांच्या तक्रारींचा मागोवा घेण्यास पुढे येते. सुटका केलेल्या मुलांना फक्त त्यांच्या ताब्यात दिले जात नाही, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांना सांत्वन केले जाते. हजारो आरपीएफ कर्मचाऱ्यांना अशा मुलांना कशाप्रकारे समजून घ्यायचे याचे प्रशिक्षण दिले जाते; परंतु प्रत्येकात एक संवेदनशील हुशार कर्मचारी दडलेला आहे. भारतात ४७२ दशलक्षहून अधिक मुले राहतात. त्यापैकी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित कुटुंबांमधून येतात. वेश्याव्यवसायात विकले जाण्यासह लैंगिक शोषण, जबरदस्तीने भीक मागणे या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे नेटवर्क एक योग्य दिशा ठरते. आरपीएफ अशा अनेक पीडितांच्या केवळ रक्षकच नाहीत तर बहीण, माता आणि सल्लागार देखील आहेत. आजही, हजारो मुले अनधिकृतरीत्या मजूर म्हणून राबतात. 'कामगार'या शब्दाचा अर्थही न समजण्याच्या वयात त्यांचे भवितव्य यात गुरफटले जाते. आरपीएफने या हजारो मुलांची सुटका केली. त्यांच्या भूमिकेचे महत्त्व ओळखून, रेल्वे मंत्रालयाने आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाल संरक्षण प्रशिक्षण, विशेषतः संवेदनशील भागात अधिक महिला कॉन्स्टेबलची भरती, सीसीटीव्ही, फलक आणि जागरूकता मोहिमांसह स्टेशन पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि जिल्हा बाल कल्याण अधिकारी आणि बाल न्याय मंडळांशी चांगले समन्वय यामध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय रेल्वे केवळ वाहतूक नेटवर्क नसून प्रत्येक मुलासाठी एक सुरक्षित कॉरिडॉर आहे.
- ए. इब्राहिम शेरीफ आयआरपीएफएस, डीआयजी-कम-सीएससी, आरपीएफ/दक्षिण रेल्वे