Thursday, November 13, 2025

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा

मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या पक्षचिन्हावरून वाद सुरू असतानाच शरद पवारांना पक्षचिन्हावरून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे फटका बसला होता. पिपाणी हे चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळले आहे.

चिन्ह साधर्म्याचा फटका आता बसणार नाही

हा शरद पवारांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाने केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांना जसा या चिन्ह साधर्म्यामुळे फटका बसला, तसा कोणताही प्रकार आता होणार नाही.

बेलापूरमध्ये निसटता पराभव

बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक हे अवघ्या ३७७ मतांनी पराभूत झाले. त्यावेळी पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने तब्बल अडीच हजारांहून अधिक मते घेतल्याने संदीप नाईकांचा पराभव झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला होता.

विधानसभेला ९ जागांवर बसला फटका

पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या चिन्हाच्या गोंधळामुळे मतदारांनी चुकीच्या चिन्हावर (पिपाणी) मतदान केले, ज्यामुळे पक्षाच्या तुतारी चिन्हाला मतांचे विभाजन झाले आणि ९ जागांवर उमेदवार पराभूत झाल्याचे आकडेवारी दाखवत सांगण्यात आले. या जागांवर पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते पराभवाच्या फरकापेक्षा जास्त होती, ज्यामुळे पक्षाला हानी पोहोचली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा