मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट मुंबई महापालिका निवडणुकांकडे मोर्चा वळवला आहे. “बिहारमध्ये दिसले ते फक्त झलक होती, खरी लढाई मुंबईत आहे,” अशा शब्दांत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक रणधुमाळीची सुरुवात केली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूवर जोरदार टीका केली.
साटम म्हणाले की, मुंबईकरांच्या पैशावर डल्ला मारणे, संपत्तीची लूट करणे आणि महापालिकेचा गैरवापर करणे, हे गेल्या गेल्या २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांचे काम होते. “महापालिकेवर राज्य करणारे हे डाकू आहेत,” असा थेट आरोप करत त्यांनी नाव न घेता ठाकरे कुटुंबावर हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट केलं की, “मुंबई महापालिका ही कोणाच्याही घराण्याची जागीर नाही; मुंबईकरांची सेवा करण्यासाठी ही व्यवस्था आहे,” असे ते म्हणाले.
राहुल गांधी व आदित्यवरही टीका
बिहारमधील विजयाबद्दल बोलताना साटम म्हणाले, “विरोधक पराभव झाला की वोटचोरी म्हणतात आणि जिंकले की लोकशाही आठवते. बिहारने दाखवून दिलं की देशाचा ‘पप्पू’ कोण.” त्यांनी पुढे महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य करत, “महाराष्ट्राचा पप्पू कोण आहे हे सांगायची गरज नाही. लवकरच त्यांनाही धडा शिकवू,” असे म्हटले, आणि नाव न घेता आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “कोण कोणासोबत येतंय यापेक्षा ११ वर्षांत मुंबईचा विकास कोणी केला, बीडीडी चाळ पुनर्विकासांतून ५५० चौ.फु. घर कोण देतंय, आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी मिळवून दिला, हे अधिक महत्त्वाचं,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.






