बिहार : बिहारच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांनी पहिल्याच प्रयत्नात भक्कम आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या निकालांमधून दिसत आहे की स्थानिक मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अंदाजे एक महिना आधीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत “बिहारची सेवा” करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
बिहार निवडणूक 2025 चे निकाल उत्सुकतेने पाहत असताना, एक्झिट पोलमध्ये एनडीएच्या मोठ्या विजयाचे संकेत मिळाल्यानंतर मैथिली ठाकूर यांनी “पूर्णपणे तयार” असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या निवडणूक प्रचारातील तीस दिवसांच्या अनुभवाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की विजय-पराजयावर विचार करण्यापेक्षा लोकांशी झालेल्या नव्या संबंधाने त्यांना समाधान मिळाले आहे.
त्यांच्या मते, निवडणूक लढवण्याचा निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. लोकांसोबत संवादातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या कोणत्याही पुस्तकातून किंवा इतर माध्यमातून शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. हा एक महिना त्यांच्या आयुष्याला नव्या दिशेने घेऊन गेला, असेही त्या म्हणाल्या.
यापूर्वीच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांना आपल्या लोकगीतांमधून बिहारचे संस्कृतिक मूल्य जगासमोर आणण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी परदेशात जाण्याचा मार्ग निवडला नाही. राजकारण हा करिअरपेक्षा प्रदेशाची सेवा करण्याचा माध्यम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाबद्दल विशेष ओढ नसलेल्या मैथिली ठाकूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांनी आणि नेतृत्वाने प्रेरित केले. मोदी हे तरुणांसाठी मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.






