निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए तसेच महागठबंधनने पूर्ण ताकद लावली होती. याच निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ११ नोव्हेंबर रोजी पार पडली. मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचेही आकडेही जाहीर केले. या एक्झिट पोलच्या आकड्यांत नेमके कोणाचे सरकार येणार? याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून एका संस्थेच्या पोलचा अपवाद वगळता इतर सर्वांनीच भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएचे पारडे जर भरणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. बिहारमध्ये १९५२ नंतर प्रथमच विक्रमी मतदान झाले असन महिलांनीही यावेळी विक्रमी मतदान केले असून यामुळे एनडीएचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.
आता अवघ्या काही तासांत बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे ही निवडणुक नेमके कोण जिंकणार? हे स्पष्ट होणार आहे?
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत झाली. २४३ जागांसाठी ही निवडणूक आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
प्रशांत किशोर शब्द पाळणार का?
बिहारची विधानसभा निवडणूक एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी ही सरळ निवडणूक होती. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील या निवडणुकीत उडी घेत अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांनी केलेला आक्रमक प्रचार व नितीश कुमार यांच्यावर केलेला हल्लाबोल यामुळे बिहारमधील राजकारण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे यावेळी नेमके कोण बाजी मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. भाजपा, नितीश कुमार यांचा जदयू या दोन प्रमुख पक्षांसह इतरही मित्रपक्षांनी एनडीए म्हणून निवडणूक लढवली तर महागठबंधनमध्ये काँग्रेस, तेजस्वी यादव यांच्या आरजेडी या प्रमुख पक्षांनी निवडणुकीचे मैदान गाजवले. प्रशांत किशोर यांनी आपली भाकीते खरी न ठरल्यास राजकारण सोडण्याची घोषणा केली होती, ती घोषणा ते पूर्ण करणार, याचीही चर्चा निकालाअगोदरच सुरु झाली आहे.






