Thursday, November 13, 2025

'इडन गार्डन्स' वर आजपासून द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी !

'इडन गार्डन्स' वर आजपासून द.आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी !

पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निश्चित ; शुभमनने दिले संकेत

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात शुक्रवारपासून (१४ नोव्हेंबर) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत असून पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचाही भाग आहे. या मालिकेसाठी सध्या दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.

गतविजेता दक्षिण आफ्रिका संघही भारताला तगडे आव्हान देण्याच्या तयारी असला, तरी शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघही या आव्हानासाठी सज्ज आहे. गिलनेही दक्षिण आफ्रिका संघ चांगला आहे, पण त्यासाठी तयार असल्याचे पहिल्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याबाबत बरीच चर्चा झाली आहे. गिलनेही हे मान्य केले की पहिल्या कसोटीमध्ये फिरकीपटू की ज्यादाचा वेगवान गोलंदाज खेळवायचा यामध्ये अद्यापही संभ्रम आहे. तसेच कोलकातामधील वातावरण आणि खेळपट्टीवरील परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

तथापि, गिलने सांगितले की प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली आहे, पण तरी अंतिम निर्णय नाणेफेकीच्या आधी घेतला जाईल. पण गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणकोणाला संधी देणार आहे, याबाबत मात्र खुलासा पत्रकार परिषदेत केला नाही.

'परिस्थिती पाहूण प्लेइंग इलेव्हन ठरवू'

गुरुवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गिल म्हणाला, 'वर्षातील ही अशी वेळ असते की संघात एक ज्यादाचा वेगवान गोलंदाज की फिरकीपटू खेळवायचा, यात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे आम्ही उद्या एकदा परिस्थिती पाहू आणि प्लेइंग इलेव्हन ठरवू.' गिल पुढे म्हणाला, 'संघ तसा ठरला आहे. पण बुधवारी खेळपट्टी वेगळी जाणवली होती, तर आता वेगळी दिसत आहे. त्यामुळे आता उद्या सकाळी (शुक्रवारी) एकदा आम्ही खेळपट्टी पाहू आणि मग फिरकीपटूंचे संमिश्रण कसे ठेवायचे याचा विचार करू. कितीही झालं, तरी भारतात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका निभावतात.' याशिवाय कोलकातामध्ये या दिवसाच लवकर अंधार पडत असल्याने या गोष्टीही लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

बुमराह आणि मोहम्मदला खेळवणार?

भारतीय संघ जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची दाट शक्यता आहे. पण त्यांच्यासह आकाश दीप हा देखील तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून एक पर्याय आहे. याशिवाय भारताकडे फिरकी गोलंदाजीसाठी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे पर्याय आहेत. यातील जडेजा, अक्षर आणि सुंदर हे तिघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. गिलने संघात चांगले अष्टपैलू असल्याबद्दलही आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'चांगली गोलंदाजी करणारे अष्टपैलू संघात असणे कधीही चांगले असते. मग अक्षर असो, सुंदर असो किंवा जडेजा असो, त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी, या दोन्ही विभागातील कामगिरी चांगली आहे, विशेषत: भारतात ही कसोटी मालिका रोमांचक असेल, त्यामुळे संघात अनेक पर्याय असणे चांगले आहे.'

गोलंदाजांची कामगिरीही महत्त्वाची

याशिवाय गिलने असेही संकेत दिले की कोलकातामध्ये वेगवान गोलंदाजांची कामगिरीही महत्त्वाची ठरू शकते. त्याने म्हटले की 'जर खेळपट्टी कोरडी असेल, तर रिव्हर्स स्विंगची महत्त्वाची भूमिका असते. २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध वेगवान गोलंदाजांनी फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्ट्यांवरही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. जर खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स होत असेल, तर वेगवान गोलंदाज नेहमीच महत्त्वाचे असतात.'

शमी दर्जेदार गोलंदाज, पण...

मोहम्मद शमीला संघात स्थान न देण्यावरून बरीच चर्चा झाली. यावेळी अनेक विजयांवर भाष्य केले. त्याने शमीला संघातून वगळण्याबाबत म्हटले की हा कठीण निर्णय आहे, पण संघातील इतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. त्याने पश्चिम बंगालकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. मात्र असे असतानाही, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. गिल म्हणाला, 'नक्कीच त्याच्यासारखा दर्जा असणारे गोलंदाज जास्त नाहीत. पण सध्या खेळत असलेल्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कधी कधी हे कठीण असते की शमी भाईसारखा खेळाडू संघात नसतो. पण आम्हाला पुढचा विचारही करावा लागले, विशेषत: परदेशात दौरे करताना.' याशिवाय त्याला जेव्हा विचारण्यात आले की शमी भारतीय संघाच्या भविष्यातील योजनेमध्ये आहे का, त्यावर गिलने उत्तर दिले की 'याचं उत्तर चांगलं निवड समितीच देऊ शकते.'

गिलच्या निशाण्यावर गावस्करचा ‘महाविक्रम’

शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ कसोटी सामन्यांतील १३ डावांमध्ये ७८.८३ च्या उत्कृष्ट सरासरीने ९४६ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी गिलला केवळ ५४ धावांची गरज आहे. जर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत हा पराक्रम साधला, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनेल. सध्या हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी कर्णधार म्हणून १५ कसोटी डावांमध्ये १००० धावा करण्याचा पराक्रम केला होता.

के.एल राहुल विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या कसोटीत, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल याला त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. के.एल राहुलने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यांतील ११४ डावांमध्ये ३६.५५ च्या सरासरीने ३९८५ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. जर राहुलने कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी १५ धावा केल्या, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ४,००० धावा पूर्ण करेल आणि अशी कामगिरी करणारा तो १८ वा भारतीय फलंदाज ठरेल.

Comments
Add Comment