पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे प्रादेशिक पक्ष झाला. आता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे. अजित पवार राष्ट्रवादीला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार विधानसभेच्या १४ जागांवर उमेदवार उभे केले. पण या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. बिहारमध्ये झालेल्या पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याचे अजित पवारांचे स्वप्न अपूर्णच राहिले. तांत्रिकदृष्ट्या आजही राष्ट्रवादी काँग्रेस प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत आहे.
नारकटियागंज, नौटन, पिंप्रा, मनिहारी, पारसा, सोनेपूर, महुआ, राघोपूर, बाखरी, अमरपूर, पाटना साहिब, मोहानिया, सासाराम, दिनारा या मतदारसंघात राष्ट्रवादीनं उमेदवार दिले होते. यातील एकाही उमेदवाराला छाप पाडता आलेली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. पण राज्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवणे जमलेले नाही. आता बिहारमधील दारुण पराभवामुळे राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अजित पवारांच्या स्वप्नांना पुन्हा सुरुंग लागला आहे.






