Thursday, November 13, 2025

बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

बांगलादेशला परतण्यास शेख हसीनांची सशर्त तयारी

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, त्यांनी यासाठी काही अटी घातल्या आहेत. सहभागी लोकशाही पुनर्संचयित झाल्यावर आणि त्यांच्या पक्ष अवामी लीगवरील बंदी उठवल्यानंतरच त्या देशात परततील, असे त्यांनी सांगितले आहे. शेख हसीना यांनी मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुकांची मागणी केली आहे. काही दिवसापूर्वी अवामी लीगने देशभरात आंदोलनाची घोषणा केली, या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांनी देशात परतण्याची चर्चा केली आहे.

सध्या भारतात एका गुप्त ठिकाणी वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याचे अंतरिम सरकार आणि त्यांचे प्रमुख मुहम्मद युनूस यांच्यावर भारताशी असलेले संबंध खराब करण्याचा आणि अतिरेकी घटकांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला. त्यांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना अंतरिम सरकारशी करताना, त्या म्हणाल्या की, ढाका आणि नवी दिल्ली यांच्यातील ‘विस्तृत आणि खोल’ संबंधांमुळे युनूस यांच्या मूर्ख कृत्यांचा ठामपणे प्रतिकार केला पाहिजे.

शेख हसीना यांनी आश्रय दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सहभागी लोकशाहीची पुनर्स्थापना. अंतरिम प्रशासनाने अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुका घ्याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या हसीना, या काही आठवड्यांच्या हिंसक सरकारविरोधी निदर्शनांनंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून गेल्या. आंदोलनाच्या दबावाखाली, त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Comments
Add Comment