मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी हातपाय हलवण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, अपेक्षेच्या विरुद्ध पाऊल उचलत शीतल म्हात्रे यांनी महापालिकेची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पक्षातर्फे उमेदवारी मिळाली तरी त्या निवडणूक लढवणार नाहीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
“मी निवडणूक लढवणार नाही, पक्षाच्या उमेदवारासाठी काम करणार”
शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, त्या दहिसरमधील वॉर्ड क्रमांक ८ च्या दोन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत आणि पक्ष संघटनेत महिला पदाधिकारी म्हणूनही त्यांनी सक्रिय काम पाहिलं आहे. मात्र आता त्या स्वतः निवडणूक लढवणार नसून, वॉर्ड क्रमांक ७ मधून ज्याला पक्ष उमेदवारी देईल, त्याच्या समर्थनार्थ काम करणार आहेत. यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचे शीतल म्हात्रे यांनी जाहीर केले.
शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, आता त्यांचा फोकस स्थानिक निवडणुकीवर नसून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या मते, दोन कार्यकाळ नगरसेविका म्हणून काम करून त्यांनी स्थानिक प्रशासनाचा पुरेसा अनुभव घेतला आहे, आणि आता हे अनुभव मोठ्या पातळीवर उपयोगात आणायचे आहेत.
महायुतीकडून यावेळी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अ.प.गट) मिळून निवडणूक लढवणार असून, या पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रे यांचा हा निर्णय पक्षासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, शीतल म्हात्रे आता नगरसेविकेऐवजी आमदारकीच्या मैदानावर उतरायला सज्ज झाल्या आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.






