दिल्लीच्या लाल किल्ल्यानजीक घडवलेला बाॅम्बस्फोट आणि त्यात वापरलेली स्फोटके पाहता हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घडवलेले दहशतवादी कृत्य मानता येते. ‘जैश-ए-मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी देशाच्या राजधानीमध्ये स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणांना आव्हान दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुमारास स्फोट घडवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.
यंदा २२ एप्रिलला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. भारताने ६ मेच्या रात्रीपासून ४ दिवस पाकिस्तानमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवली. ‘जैश-ए-मोहंमद’सह अन्य दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यातही ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा करण्यात आला. त्यामुळे चवताळलेली ‘जैश’ स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नाक कापल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी गट काहीतरी करणार हे अपेक्षित होतेच. त्यामुळे तर ‘जैश’ने आता महिलांची दहशतवादी ब्रिगेड स्थापन करून भारताविरोधात वापरण्याचे ठरवले होते. अलीकडेच ‘जैश’चा म्होरक्या मसूदने भारतात दहशतवादी कारवाया करण्याची धमकी दिली. त्यानंतर भारतातील तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. जम्मू-काश्मीर, फरिदाबाद, लखनऊ, अहमदाबाद येथून काहीजणांना अटक केली. यातील बहुतेकांचा ‘जैश’शी संबंध आहे. भारताचा मानबिंदू असलेल्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ अतिशय नियोजनबद्धतेने स्फोट घडवत सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करता आली हे महत्त्वाचे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय तपास संस्था, दिल्ली पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक यंत्रणा तसेच अन्य घटकांशी चर्चा करून दिल्लीच्या स्फोटाचे मूळ शोधायला सुरुवात केली. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. दिल्ली पोलीस, ‘एनआयए’, ‘एनएसजी’ आणि ‘एफएसएल’च्या पथकांनी तपास सुरू केला. घटनास्थळाभोवती असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली, तरी पूर्वी अटक केलेल्यांच्या तपासातून त्यांचा ‘जैश’शी आणि अटक केलेल्यांचा दिल्ली बाँबस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. स्फोटानंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) दिल्ली मेट्रो, लाल किल्ला, सरकारी इमारती आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कडक केली. संवेदनशील प्रतिष्ठानांवर अतिरिक्त दल तैनात करण्यात आले असले, तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कोणत्याही दहशतवादी घटनेनंतर देशात काही दिवस सतर्कता बाळगली जाते आणि नंतर दुर्लक्ष केले जाते.
दरम्यान, केंद्रीय एजन्सींसह हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गजवत-उल-हिंद’शी संबंधित ‘एका व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तो काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरला होता. अटक केलेला संशयित दहशतवादी डॉ. मुझमिल अहमद गनी उर्फ मुसैब याच्या तपासातून पोलीस यंत्रणेला मिळालेली माहिती धक्कादायक आहे. त्याच्याशी संबंधित महिला डॉ. शाहीन हिला अलीकडेच लखनऊमध्ये अटक करण्यात आली. तिच्या कारमधून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली. यापूर्वी, अनंतनाग येथील रहिवासी डॉ. आदिल अहमद याला ७ तारखेला सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली. तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होता. आरिफ निसार दार, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दार उर्फ शाहिद हे नौगाम, श्रीनगरचे, मौलवी इरफान अहमद शोपियानचा, जमीर अहमद अहंगर हा गंदरबलचा, डॉ. मुझम्मिल अहमद गनई आणि डॉ. आदिल हे कुलगाममधील नागरिक आहेत. स्फोट झालेल्या कारच्या विक्रीचे टप्पे पाहिल्यास हे कनेक्शन पुलवामापर्यंत पोहोचते. या प्रकरणात डॉ. उमरसह आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. मुझम्मिल आणि आदिलच्या फोनवर अनेक पाकिस्तानी नंबर सापडले. मुझम्मिल अल फलाह विद्यापीठात डॉक्टर म्हणून काम करत होता. २,९०० किलो स्फोटकांपैकी ३६० किलो स्फोटके आणि काही शस्त्रे तसेच दारूगोळा डॉ. मुझम्मिलच्या फरिदाबादमधील भाड्याच्या घरातून जप्त करण्यात आला. फतेहपूर तागा गावातील एका खोलीतून २,५५० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. मुझ्झमिलने श्रीनगरमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या समर्थनार्थ पोस्टर्स लावली होती. दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करून, सुरक्षा यंत्रणांनी ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि भारतातील ‘इसिस’चा गट ‘अन्सार गजवत-उल-हिंद’च्या धोकादायक योजना उधळून लावल्या; परंतु दिल्लीच्या कटाचा सुगावा लागला नाही.
जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा वापर शेकडो अत्यंत शक्तिशाली आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस) बनवण्यासाठी केला गेला असता. अमोनियम नायट्रेट हे एक पांढरे, पावडरसारखे रसायन आहे. ते फार महाग नसते. त्यात डेटोनेटर, बॅटरी आणि टायमर जोडल्याने एक घातक बॉम्ब तयार होतो. डॉ. मुझम्मिल अहमद गनी उर्फ मुसैब याने चौकशीदरम्यान कबुली दिली. त्याच्या पाकिस्तानी हँडलरने त्याला सांगितलं होतं, की या वेळी स्फोट इतका भयानक असेल, की मृतांची संख्या हजारोंमध्ये जाईल. दहशतवादी संघटनेची ही धोकादायक योजना अमलात आणण्यासाठी २९०० किलो स्फोटके फरिदाबादला पाठवण्यात आली होती. फरिदाबादमधील यात्रेला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. त्यात डॉ. शाहीन सहभागी होती. या यात्रेला सुमारे ४० हजार लोक उपस्थित होते. यात्रेला लक्ष्य करण्यापूर्वी संशयित दहशतवादी मुसैबला अटक करण्यात आली. त्यामुळे त्याचा कट उधळला. डॉ. उमर त्यांच्या कटात सहभागी होता. त्याचा संबंध दिल्ली बाॅम्बस्फोटाशी जोडला जात आहे. तो अजूनही तपास यंत्रणांना सापडलेला नाही.
२०१९ मध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे अशाच प्रकारच्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट केला. त्यात ४० सैनिकांचे बलिदान झाले. कारमध्ये झालेल्या स्फोटाच्या कारणाबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटना स्थानिक पातळीवर घडल्या होत्या की त्यांचा देशाबाहेर संबंध होता? उमर मोहम्मदच दुर्घटनाग्रस्त आय-२० कार चालवत असल्याचा संशय आहे. पोलीस आता कारच्या ड्रायव्हरच्या सीटवर सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. दहशतवादी गटांकडून वापरली जाणारी ही एक प्रसिद्ध कार्यपद्धती आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक आणि दहशतवादविरोधी पथकांना काही आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. अशा बॉम्बस्फोटांनंतर जमिनीवर एक खड्डा तयार होतो आणि शार्पनेल विखुरलेले असते; परंतु येथे असे काहीही आढळले नाही. आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचे मिश्रण किंवा अत्यंत ज्वलनशील रसायन वापरण्यात आल्यामुळे खड्डा पडला नसावा, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. हा आत्मघातकी हल्ला होता का याचाही तपास पोलीस करत आहेत. तथापि, या सिद्धांतावर प्रश्न उपस्थित करणारी एक बाब म्हणजे स्फोटाच्या वेळी कारमध्ये तीन लोक होते. सहसा आत्मघातकी हल्ल्यांमध्ये फक्त एक किंवा दोन लोक असतात. लाल किल्ल्याअगोदर ही कार सुन्हेरी मशिदीजवळ गाडी दिसली. ती दोन तास तिथेच राहिली. त्यानंतर ती लाल किल्ल्याकडे नेण्यात आली. बहुतेक लोकांच्या मृतदेहावर शार्पनेलचे कोणतेही चिन्ह नव्हते. एकंदरीत, दिल्लीच्या घटनेमागे मोठे षडयंत्र असून त्यातून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हेतू होता, हे स्पष्ट दिसते.
- भास्कर निघूट(लेखक वायुदलात वरिष्ठ संशोधक होते)