मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत तोच ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने अर्थात एमआयएमने मुंबईच्या राजकारणात मोठा बॉम्ब फोडला आहे. एमआयएमने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, ही माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष हाजी फारुख मक्बुल शाब्दी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हाजी शाब्दी म्हणाले, 'मुंबई महापालिकेसाठी आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही किमान ५० उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहोत. लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल.' पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “आमचा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर काम करत आहे. पक्षात दीर्घकाळ कार्य करणाऱ्यांनाच तिकीट देण्यास प्राधान्य राहील. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल होणाऱ्यांचा विचार नंतर केला जाईल.”
मुंबईच्या राजकारणात समीकरणे बदलणार?
एमआयएमचा मुंबईची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा काहींसाठी धक्कादायक ठरला आहे. मुंबईतील मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. यावर शाब्दी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “आमच्यावर भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप काही नवा नाही. पण आम्ही आमच्या ताकदीवर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडणूक लढवणार आहोत. कोणाच्याही फायद्यासाठी नव्हे, तर आमच्या जनतेच्या प्रतिनिधित्वासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत.”
सध्या राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा केली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीच्याही तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
एमआयएमच्या या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणातील समीकरणे नव्याने बदलण्याची चिन्हे दिसत असून, या निवडणुकीत आता कोण कशी रणनीती आखतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.






