Thursday, November 13, 2025

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग (टीबी) रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, देशाच्या आरोग्य क्षेत्राने साधलेल्या प्रगतीचे कौतुक केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या ग्लोबल टीबी रिपोर्ट २०२५ नुसार, भारतात २०१५ पासून नवीन टीबी प्रकरणांमध्ये तब्बल २१ टक्क्यांनी घट झाली आहे. ही घसरण जागतिक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

२०१५ मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे २३७ रुग्ण नोंदवले जात होते, तर २०२४ पर्यंत हा आकडा १८७ पर्यंत खाली आला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जागतिक स्तरावर ही घट केवळ १२ टक्के आहे, तर भारताने त्यापेक्षा अधिक वेगाने सुधारणा साधली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले, “क्षयरोगाविरुद्ध भारताचा लढा आता लक्षणीय गतीने पुढे सरकत आहे. २०१५ नंतर टीबी रुग्णसंख्येत झालेली घट ही जगातील सर्वाधिक वेगाने झालेली प्रगती आहे.”

ते पुढे म्हणाले, “उपचार सेवांचा विस्तार, निदान प्रणालीतील सुधारणा आणि उपचार यशाचा वाढता दर, या सर्व घटकांमुळे देशाने हा टप्पा गाठला आहे. या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. निरोगी भारत हेच आपले ध्येय आहे.”

WHO च्या ग्लोबल टीबी रिपोर्ट २०२५ मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, भारतात टीबीविरोधी मोहिमेमुळे लक्षणीय यश मिळाले असून, ही सुधारणा इतर देशांसाठी प्रेरणादायी आहे. भारताच्या ‘निक्षय’ उपक्रमासारख्या योजनांनी रुग्ण ओळख, उपचार आणि पोषण सहाय्य यात मोठा फरक पडल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. विविध राज्यांमध्ये आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणे, डिजिटल रेकॉर्ड प्रणाली, आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांबरोबर भागीदारी, या उपाययोजनांमुळे देशात टीबी नियंत्रणात आणण्यास मदत होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा