Thursday, November 13, 2025

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु या व्हायरल झालेल्या दृश्यांवरून अनेकांनी महाराजांवर टीकेची झोड उठवली. “साधेपणाने लग्न करावे” असा उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा एवढ्या थाटामाटात साजरा करत आहेत, अशी सोशल मीडियावर टीका करण्यात आली.

या सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी अलीकडच्या एका कीर्तनात या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली आणि कीर्तन सोडण्याचा संकेत दिला !

इंदुरीकर म्हणाले “आम्ही किती कष्ट करून संसार उभा केला, याचा कोणी विचार करत नाही. मुलं लहान असताना आठ-आठ दिवस त्यांच्याशी भेट होत नसे. पण आता लोक इतके खाली गेलेत की, माझ्या मुलीच्या कपड्यांवरूनही कमेंट्स करतायत, यापेक्षा वाईट काय असू शकतं. चार दिवसांपासून तिच्या कपड्यांवर बातम्या चालतायत. माझ्या घरच्यांचा यात काय दोष? तुमच्याही मुली असतील, त्यांच्या कपड्यांवर कोणी टीका केली तर काय वाटेल? या सर्वांमुळे मनःस्ताप झाला आहे.”

ते पुढे म्हणाले “मी आता कंटाळलो आहे. गेली ३१ वर्ष लोकांच्या सेवेत कीर्तनं केली, शिव्या ऐकल्या, पण हे आता घरापर्यंत पोहोचलंय. मी दोन-तीन दिवसांत एक निर्णय घेणार आहे. आणि आता थांबणार आहे"

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा संगमनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा हा सोहळा राजेशाही थाटात झाला. रथातून मिरवणूक, टाळकरी, बायकांच्या फेऱ्या अशा पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम रंगला.

या साखरपुड्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराजांनी सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ स्वीकारले नाहीत, साधेपणात त्यांनी हा सोहळा पार पाडला.

परंतु सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबावर झालेल्या टीकेमुळे त्यांनी कीर्तन सोडण्याचा इशारा दिला आहे. आता येत्या २-३ दिवसात ते कोणता निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >