मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चगेट-बोरिवली लोकल ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग करून तिच्या संमतीशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चर्चगेट रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. चर्चगेट ते बोरिवली जलद लोकलच्या जनरल डब्यात प्रवास करत असताना, एका व्यक्तीने आपल्या मोबाईल फोनद्वारे तरुणीचा व्हिडीओ चोरून रेकॉर्ड केला. ही महिला वकिल वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असून, ती मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी वकील आहे.
आरोपीचे नाव हिमांशू गांधी (वय ४०) असे असून, तो मालाड पूर्व येथील रहिवासी आहे आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. तरुणीने ही घटना लक्षात घेतल्यावर ट्रेनमधून उतरताच ती थेट बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली.ही घटना चर्चगेट रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत घडल्याने , बोरिवली पोलिसांनी तक्रार पुढील तपासासाठी चर्चगेट पोलिसांकडे वर्ग केली. पोलिसांनी १० नोव्हेंबर रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७, ७८ आणि ७९ अंतर्गत गुन्हा नोंदवला.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिस आरोपीकडून मोबाईल फोन जप्त करून त्यातील व्हिडीओ पुरावे तपासत आहेत. दरम्यान, लोकल ट्रेनमधील अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने, प्रवासी विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. रेल्वे पोलिसांनी महिलांना अशा प्रसंगी तत्काळ तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.






