नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, या स्फोटासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाला “कायद्याने शक्य तितकी कठोर शिक्षा” दिली जाईल. शाह म्हणाले की, या प्रकरणाचा निकाल असा असेल की जगाला संदेश मिळेल,'भारताच्या भूमीवर हल्ला करण्याचे धाडस कोणीही करू नये.'
गुजरातमधील मोतीभाई चौधरी सागर सैनिक शाळेच्या उद्घाटनानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करताना अमित शाह यांनी दिल्लीतील स्फोटात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले, “दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यात गुंतलेल्यांना अशी शिक्षा दिली जाईल की ती जगासाठी एक इशारा ठरेल.”
शाह यांनी पुढे सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. देशात अशा कृत्यांना मुळीच स्थान नाही आणि दोषींना शिक्षा मिळाल्याशिवाय हा तपास थांबणार नाही.”
पंतप्रधान मोदी भूतान दौर्यावरून परतल्यानंतर तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाला “दहशतवादी हल्ला” म्हणून घोषित करण्यात आले आणि याचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर तपास यंत्रणांना तातडीने आणि व्यावसायिक पद्धतीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. उमर नबी याची फोर्ड इकोस्पोर्ट कार फरीदाबादच्या खांडवली गावातून जप्त केली आहे. तपासकर्त्यांच्या मते, स्फोटासाठी ह्युंदाई i20 कारचा वापर करण्यात आला होता, तर जप्त केलेली इकोस्पोर्ट ही संशयितांच्या साथीदारांनी वापरल्याचा अंदाज आहे.
प्राथमिक चौकशीत हा स्फोट दहशतवादी कटाचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या प्रकरणासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, दिल्ली व हरियाणा परिसरात तपास जलद गतीने सुरू आहे.






