Thursday, November 13, 2025

‘स्थानिक’निवडणुकांसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

‘स्थानिक’निवडणुकांसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश

मुंबई : निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात २ डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.

राज्यात काही ठिकाणी भाजप महायुतीत लढणार

समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी भाजप ही निवडणूक महायुतीमध्ये लढणार आहे, तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, कारण यानंतर आता लगेच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले होते, त्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment