दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारबॉम्बच्या स्फोटाने संपूर्ण दिल्ली हादरली. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की तीन दिवस उलटल्यानंतरही घटनास्थळाजवळ विखुरलेले अवशेष आणि शरीराचे तुकडे सापडत आहेत. लाल किल्ल्यापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या बाजारातील एका इमारतीच्या छतावर तुटलेला हात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तो भाग बंद करून तपास सुरू केला. I20 कारमध्ये झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी आहेत. या स्फोटात आसपासच्या वाहनांचे आणि दुकानांचेही मोठे नुकसान झाले.
दरम्यान, मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून स्फोटाची तीव्रता किती प्रचंड होती हे स्पष्ट झाले आहे. अनेक मृतांच्या हाडांचा चुराडा झाला असून डोक्याला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्फोटामुळे काहींचे कानाचे पडदे आणि फुफ्फुसे फुटल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. इतकंच नव्हे, तर शरीरातील रक्तस्राव आणि भिंतींवर आपटल्याने झालेल्या जखमांचेही ठसे आढळले.
या अहवालानंतर दिल्ली पोलिसांनी तपास अधिक गतीमान केला असून स्फोटाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे.






