समुपदेशन दरम्यान अनेकदा अशा महिलांशी संवाद साधला जातो ज्या तरुणी स्वतःच्या लग्नाआधी कोणासोबत प्रेमात आहेत किंवा ज्या विवाहित महिला कोणत्याही पर पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, प्रेम प्रकरणात आहेत अथवा विवाहबाह्य संबंधात आहेत.अशा अनेक महिलांचे विविध प्रश्न सोडवताना, त्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या अनेक समस्या एकसारख्या असल्याचे जाणवते.
आज या लेखामार्फत आपण प्रामुख्याने परपुरुषाशी संबंधात असलेल्या महिलांच्या एका वेगळ्याच त्रासाबद्दल, अपेक्षेबद्दल बोलणार आहोत. अनेक महिलांचा प्रश्न आहे, की त्यांच्याशी संबंधित पुरुष हा प्रेमाच्या नात्यात असताना, शारीरिक संबंध ठेवताना त्या महिलेवर पैसे मात्र अजिबात खर्च करत नाही. तिचा कोणताही वाढदिवस, सण-वार, काही विशिष्ट दिवस असताना सुद्धा तो पुरुष तिच्या आनंदासाठी तिला कोणत्याही स्वरूपात भेट वस्तू देणे, फिरायला नेणे, जेवायला नेणे, तिला काही हवं असल्यास ते पुरवणे यांसारखे काहीही करत नाही तर फक्त शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी मात्र तिचा वापर करतो. अनेक महिलांचे असे म्हणणे आहे, की आमच्या काही फार मोठ्या खर्चाच्या, खूप मोठ्या भेटवस्तूच्या अपेक्षा नाहीत पण निदान ज्याला आपण आपलं सर्वस्व देतोय, वेळ देतोय, ज्याच्या सर्व शारीरिक मागण्या पूर्ण करतोय, त्यासाठी रिस्क घेतोय त्याने निदान फक्त कामापुरता आपला वापर न करता थोडा फार तरी आपल्यासाठी खर्च करावा, आपली काही अडचण असल्यास आपल्याला आर्थिक मदत करावी. वास्तविक हा खूप महत्त्वाचा आणि नाजूक प्रश्न आहे. मुळात आपले लग्न झालेले असताना विवाहबाह्य संबंध ठेवणे हेच चुकीचे आहे. महिला असो वा पुरुष आपल्या लग्नाच्या जोडीदाराची फसवणूक करून दुसऱ्याचा संसार तोडण्यासाठी असे संबंध कारणीभूत ठरतात.
प्रेमसंबंधात पुरुष खर्च का करत नाहीत? या वागणुकीमागे अनेक मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे असू शकतात, जी त्या व्यक्तीच्या मानसिकतेतून आणि संबंधाच्या स्वरूपातून जन्माला येतात. पहिले कारण म्हणजे नात्याचा उद्देश आणि बांधिलकीचा अभाव अनेकदा केवळ शारीरिक गरज भागवण्यासाठी महिलेला जवळ केलेले असणे पाहायला मिळते. फक्त शारीरिक संबंध ठेवण्यापुरते भेटायचे आणि त्यानंतर तिच्याशी संबंधित कोणत्याही व्यवहारात पडायचे नाही. तिच्या अडीअडचणी, अपेक्षा, भावना, मागण्या यांचा विचार देखील करायचा नाही असे पुरुष वागताना दिसतात. विशेषत: विवाहबाह्य संबंधात किंवा 'अफेअर'मध्ये, पुरुषाचा मुख्य उद्देश केवळ शारीरिक गरजा पूर्ण करणे हा असतो. अशावेळी तो भावनिक किंवा आर्थिक 'गुंतवणूक' एक अनावश्यक खर्च मानतो. जर पुरुषाला हे नाते दीर्घकाळ टिकवायचे नसेल किंवा तो याला केवळ एक तात्पुरता व्यवहार मानत असेल तर तो खर्च करणे टाळतो. तो त्यांच्या संबंधाला जबाबदारी म्हणून, आपुलकी म्हणून पाहत नाही. अशा पुरुषांचे महिलांकडूनच सगळं घेण्यावर अधिक लक्ष असते.
आर्थिक सुरक्षितता आणि जोखीम व्यवस्थापन हा देखील मुद्दा विचारात घेणे आवश्यक आहे. पैसे वाचवण्याची वृत्ती यासाठी कारणीभूत आहे. काही पुरुषांमध्ये नैसर्गिकरीत्याच पैसे वाचवण्याची, कंजूषपणा करण्याची तीव्र वृत्ती असू शकते, जी ते अशा संबंधांमध्येही कायम ठेवतात. पुरुषांमध्ये असलेली गुंतवणुकीची भीती म्हणजेच जर नातं उघड होण्याची किंवा तुटण्याची भीती असेल, तर पुरुष खर्च करत नाही. त्याला वाटते की जर संबंध तुटले, तर केलेला खर्च फुकट जाईल. बहुतेकवेळा विवाहबाह्य संबंधांकडे पुरुष तात्पुरती सोय अथवा मजेचे साधन म्हणूनच पाहतात. अनेक महिला सांगतात, की तुला भूक लागली का, आपण कुठे जेवायचं का ही विचारणा सुद्धा त्यांच्याकडू्न होत नाही. तुला कुठे जायचंय का, काही हवं आहे का इतकं सुद्धा विचारलं जातं नाही. मुख्य कुटुंबाची जबाबदारी अंगावर असणे हे कारण देखील पुरुषाला बाहेरील स्त्रीवर खर्च करण्यापासून परावृत्त करते. विवाहित पुरुष त्यांच्या विवाहबाह्य संबंधात कमी खर्च करतात कारण त्यांना आपल्या कुटुंबासाठी पैसे वाचवून ठेवायचे असतात, जी त्यांची प्राथमिक जबाबदारी असते. बाहेरील महिलेवर पैसा खर्च झाल्यास आपलं घरातले बजेट बिघडेल अशी भीती त्यांना असते. खूप महिला सांगतात की, आपल्याला कुठे फिरायला नेण्यात, हॉटेलमध्ये नेण्यात, आपल्यासोबत खरेदी करण्यात संबंधित पुरुषाला भीती असते की त्याला कोणी तिच्या सोबत पाहिलं, ओळखीचे भेटेल आणि त्याने चोरून लपून ठेवलेले हे संबंध लोकांना समजतील. अशा भीतीमुळे पुरुष त्या महिलेला फक्त शारीरिक संबंध ठेवण्यापुरतेच भेटतात.
स्त्रीची अपेक्षा तपासणे हाही पुरुषाच्या स्वभावाचा एक भाग आहे. खर्च न करून तो स्त्रीची निष्ठा आणि प्रेमाची भावना तपासतो. जर स्त्रीने खर्च न केल्याबद्दल आक्षेप घेतला नाही, तर त्याला खात्री पटते की तिला पैशाची पर्वा नाही, गरज नाही, जे चाललंय त्यात ती खूश आहे आणि तो खर्च न करण्याची सवय कायम ठेवतो. प्रेम आणि खर्चाची गल्लत अनेक पुरुष करताना दिसतात. अशा पुरुषांना खरे प्रेम, आदर आणि भौतिक खर्च यातील फरक समजत नाही. ते नात्यात केवळ स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यावर भर देतात आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करतात. प्रेम विकत घेता येत नाही, पण प्रेम व्यक्त करण्यासाठी छोटी भेट, सेलिब्रेशन, फिरायला जाणे किंवा एकत्र जेवण आवश्यक असते, ही जाणीव त्यांच्यात नसते. अनेकदा पुरुषांना पूर्वीचे वाईट अनुभव गाठीशी असतात. जसे की भूतकाळात एखाद्या स्त्रीने पैशासाठी नाते ठेवले असेल, तर त्या अनुभवातून ते 'पुन्हा कोणावरही खर्च न करण्याचा' धडा घेतात. ती स्त्री गोड बोलून मला फसवेल त्यामुळे काहीही झाले तरी फक्त मजा करायची पण आपल्या पैशाला झळ लागू द्यायची नाही अशी त्यांची मानसिकता असते. आता आपण नात्यामधील अशा समस्या असल्यास त्यावर उपाययोजना काय यावर विचार करूयात. हे सगळंच एक अत्यंत वैयक्तिक आणि नात्यातील गुंतागुंतीचे प्रकरण आहे, खरे तर या ना त्यांना कोणताही नैतिक अथवा कायदेशीर पाया नसतो त्यामुळे यावर ठोस 'उपाय' नसला तरी, स्त्रीने स्वतःसाठी आणि नात्यासाठी काही गोष्टींवर विचार करणे महत्त्वाचे आहे. महिलांनी आत्म-मूल्यमापन आणि अपेक्षा स्पष्ट करणे जसे की महिलांनो स्वत:ला प्रश्न विचारा 'मला या नात्यातून काय हवे आहे?' आणि 'तो माझ्यासाठी काय करत आहे?' याचे प्रामाणिक उत्तर शोधा. केवळ शारीरिक जवळीक आणि भावनिक ओलावा पुरेसा आहे की नाही, याचा विचार करा. वर वर माया आणि उपाशी निज गं बया अशी जर तुमची गत होत असेल तर तुम्ही मूर्खात निघत आहात हे सत्य स्वीकारा. स्पष्ट संवाद साधून बघा तुम्ही नात्यात असलेल्या पुरुषाशी अत्यंत शांतपणे, स्पष्ट शब्दांत बोला. "मला तुमच्याकडून महागडी भेट नकोय, पण मला नात्यात भावनिक गुंतवणूक आणि आदर हवा आहे, जो एकत्र जेवायला जाणे किंवा मला भेटवस्तू देणे, मला कधी लागली तर आर्थिक मदत करणे यांसारख्या छोट्या कृतीतून दिसतो. खर्च न केल्यामुळे मला तुमच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे की नाही, अशी शंका येते, तसेच तुम्ही फक्त माझा शारीरिक वापर करत आहात असे मला वाटते हे स्पष्ट बोलत जा. तुम्ही कितीही श्रीमंत असाल किंवा आर्थिक सक्षम असाल तरी पुरुष म्हणून, मॅनर्सचा भाग म्हणून अथवा तुमची मैत्री, नातं अधिक फुलवण्यासाठी पुरुषाचे योगदान महत्वाचे आहे. शारीरिक संबंधांवर नियंत्रण ठेवा. नात्यात आदर आणि समान भागीदारी नसेल, तर केवळ शारीरिक संबंध ठेवणे टाळा. कधीही केव्हाही उपलब्ध राहू नका. त्यामुळे तुम्ही फक्त शारीरिक बाबतीत उतावळ्या असल्याचे समजते. जोपर्यंत पुरुष भावनिक आणि सामाजिक स्तरावर गुंतवणूक करत नाही, तोपर्यंत केवळ शारीरिक जवळीक साधल्यास नात्याचे महत्त्व 'फक्त शारीरिक' राहण्याची शक्यता असते. यामध्ये तुमचा फक्त वापर करून घेतला जाईल आणि तुम्हाला वेड्यात काढून समोरचा स्वतःचे ध्येय साध्य करून घेईल. सदर पुरुष तुम्हाला कुठे भेटायला बोलावतो, कुठे घेऊन जातो, त्या ठिकाणचा दर्जा काय असतो, किती आणि कसा वेळ तुमच्यासोबत घालवतो, तुमच्या सुरक्षित असण्याची, तुम्हाला आवडेल अशा ठिकाणी नेण्यासाठी तो पैसे खर्च करतोय का की कारणे सांगून टाळाटाळ करतोय याचे निरीक्षण करा.
नात्यात प्रेम आणि शारीरिक जवळीक महत्त्वाची असतेच, पण त्यासोबत आदर, समता आणि भावनिक-सामाजिक गुंतवणूक देखील तितकीच आवश्यक आहे. पैसा ही केवळ एक वस्तू नसून, ती दुसऱ्या व्यक्तीसाठी घेतलेल्या काळजीची आणि आदराची अभिव्यक्ती असते. खर्च न करणे हे अनेकदा 'मला फक्त शारीरिक संबंध हवे आहेत, याव्यतिरिक्त तुझ्यासाठी काही करण्याची गरज वाटत नाही' या पुरुषी मानसिकतेचे लक्षण असू शकते. त्यामुळे, प्रत्येक महिलेने नात्याचा आदर आणि मूल्यमापन करूनच योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या की अनेकदा तुमच्याशी संबंधित काही स्पेशल दिवशी जसे की तुमचा वाढदिवस, एखादा खास सण, व्हॅलेंटाईन डे, न्यू इयर या दिवशी असे पुरुष तुम्हाला भेटणे टाळतील, कामात व्यस्त असल्याचे सांगतील जेणेकरून काही द्यायलाच नको. अशा पुरुषांना जाणीव करून द्या की इच्छा असल्यास आजकाल भेटवस्तू कुठूनही कुठेही ऑनलाईन पण देता येतात त्यासाठी प्रत्यक्ष भेटलेच पाहिजे असे नाही. यावर त्याची प्रतिक्रिया काय, उत्तरे काय हे लक्षात घ्या, त्याच्या लेखी तुमची किंमत काय हे समजावून घ्या आणि त्यानुसारच संबंध पुढे न्या.
- मीनाक्षी जगदाळे






