Tuesday, November 11, 2025

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

नवी दिल्ली : दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगतानाच या स्फोटाचे कारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना शिक्षा होणारच, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना ठणकावले आहे. आमच्या तपास यंत्रणा स्फोट घडवणाऱ्यांचे पाळेमुळे खणून काढणार आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मोदींनी म्हटले आहे. भूतानमध्ये जागतिक शांतता प्रार्थना महोत्सव आणि भूतानच्या चौथ्या राजाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. भूतानच्या जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवात भारत सहभागी झाला आहे. जगभरातून आलेले संत सोबतच जगाच्या शांततेची प्रार्थना करतायत. त्यात १४० कोटी भारतीयांच्याही प्रार्थना आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आजचा दिवस भूतानसाठी, इथल्या राजघराण्यासाठी, जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. अनेक शतकांपासून भारत आणि भूतानचे संबंध जवळचे राहिले आहेत. सांस्कृतिक नातेही या दोन्ही देशामध्ये आहे, या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होईन, असे मी सांगितल्याने इथे उपस्थित राहिलो असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी आज भूतानमध्ये जड अंत:करणाने आलो आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे सगळेच व्यथित झाले आहेत. मी पीडित कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. मी रात्रभर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात होतो. स्फोटाचा सखोल तपास केला जाईल. आमच्या सुरक्षा यंत्रणा षडयंत्राच्या मुळापर्यंत जातील. स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना शिक्षा होणारच. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे ते म्हणाले

मोदींनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्टपणे म्हटले नसले तरी दिल्लीतील स्फोटाचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर येत आहे. स्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा होणारच, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे दहशतवादी संघटना आणि अशा संघटनांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला इशाराच दिला आहे.

सूत्रधारांना शोधून काढूच

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी खूप जड अंतकरणाने आलो आहे. काल रात्री दिल्लीत घडलेल्या भीषण घटनेने सर्वांच्याच मनाला व्यथित केले आहे. मी पीडित कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो. आज सगळा देश त्यांच्यासोबत उभा आहे. मी रात्रभर या घटनेशी संबंधित सर्व तपास यंत्रणा आणि जबाबदार लोकांच्या संपर्कात होतो, विचारविनिमय सुरू होता. माहिती गोळा करून शोध घेतला जात होता. आपल्या तपास यंत्रणा या षडयंत्राच्या मुळाशी जातील. यामागच्या सूत्रधारांना सोडले जाणार नाही. जे कुणी या घटनेच्या मागे असतील त्यांना शिक्षा दिली जाईल.

अमित शहांनी घेतली तातडीची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. बैठकीनंतरच कार स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. तसेच देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक, दिल्ली पोलीस आयुक्त आणि एनआयएचे महासंचालक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याच दरम्यान, जम्मू-काश्मीरचे डीजीपी व्हर्चुअली या बैठकीत सहभागी झाले.

बुधवारी मोदी घेणार बैठक :

बुधवारी भारतात परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत सुरक्षा दल आणि तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत संरक्षण दल, गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, असे समजते.

डॉक्टरांच्या लॉकरमधून एके-४७ जप्त :

जम्मू-काश्मीरमधील जीएमसी अनंतनाग येथील डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल सापडल्याने सुरक्षा यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेनंतर काश्मीरमधील सर्व मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एनआयए करणार स्फोटाचा तपास :

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान समोर आले की काही डॉक्टर आणि मौलवी मिळून ‘स्लीपर सेल’ नेटवर्क चालवत होते. या प्रकरणाचे धागेदोरे फरिदाबाद-दिल्ली मॉड्यूल आणि जम्मू-काश्मीरमधील रुग्णालयांशी जोडले गेल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे. लालकिल्ला स्फोटाच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)कडे देण्यात आली आहे. एनआयएच्या पथकांनी देशातील अनेक राज्यांत छापे टाकले असून, तपासाचा फोकस आता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नेटवर्कवर राहणार आहे.

मौलवीकडून विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश

इरफान नावाचा मौलवी, जो पूर्वी जीएमसी श्रीनगरमध्ये पॅरामेडिकल स्टाफ आणि इमाम म्हणून काम करत होता, त्याने काही मेडिकल विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश केले असल्याचे तपासात उघड झाले आहे. या विद्यार्थ्यांचा संबंध जैश-ए-मोहम्मद (जेईएम) संघटनेच्या विचारधारेशी जोडला गेला असून, इरफान आणि तीन डॉक्टरांनी मिळून फरिदाबाद-दिल्ली मॉड्यूल तयार केल्याची शक्यता तपासात समोर आली आहे. फरिदाबाद पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण अल-फलाह विद्यापीठातील तीन डॉक्टरांची सखोल चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी दिल्ली स्फोट प्रकरणाशी आणि त्यातील संशयित डॉक्टर-मौलवी नेटवर्कशी संबंधित आहे. महाराष्ट्रासह जम्मू-कश्मीर, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथके तैनात केली आहेत.

दिल्ली स्फोटातील जखमींची यादी

१) शायना परवीन २) हर्षुल सेठी ३) शिवा जायसवाल ४) समीर ५) जोगिंदर ६) भवानी शंकर सहरमा ७) गीता ८) विनय पाठक ९) पप्पू दूधवी, उत्तर प्रदेश १०) विनोद सिंह ११) शिवम झा १२) अज्ञात १३) मोहम्मद शहनवाज १४) अंकुश शर्मा १५) मोहम्मद फारुख १६) तिलकराज १७) अज्ञात १८) मोहम्मद सफवान १९) मोहम्मद दाऊद २०) किशोरीलाल २१) आझाद २२) मोहम्मद दाऊद, गाजियाबाद २३) आजाद रसुलुद्दीन, दिल्ली २४) मोहम्मद शहनवाज, दिल्ली २५) गीता शिव प्रसाद, दिल्ली २६) विनोद विशाल सिंह, दिल्ली

विदेशातूनही शोक व्यक्त

कार स्फोटाचा जागतिक नेत्यांनी निषेध केला आहे. अमेरिकेने सांगितले की, ते घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या नागरिकांसाठी सुरक्षा सतर्कता जारी केली आहे. युके, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाने भारतासोबत एकता व्यक्त केली, तर अर्जेंटिना, इजिप्त आणि मोरोक्कोने शोक व्यक्त केला. इराण, श्रीलंका, मालदीव, नेपाळनेही सहानुभूती व्यक्त केली.

Comments
Add Comment