वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र
पुणे एकेकाळी निवांत, सुसंस्कृत आणि सुरक्षित म्हणून ओळखले जाणारे शहर. शिक्षण, संस्कृती, तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगतीच्या बळावर पुण्याने ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ ही ओळख कमावली. पण आज झपाट्याने वाढणाऱ्या शहरावर ‘असुरक्षिततेची’ ती एक गडद सावली पडू लागली आहे.
पुणे शहर हे एकेकाळी पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात होते. शिक्षण, संस्कृती आणि शांत जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराने गेल्या दोन दशकांत झपाट्याने नागरीकरण अनुभवले आहे; परंतु या विकासाच्या वेगात सुरक्षा, पर्यावरण, वाहतूक, सामाजिक मूल्ये आणि नागरी जबाबदारी यांचा समतोल बिघडताना दिसत आहे. आज पुणे विविध स्तरांवर असुरक्षित बनत चालले आहे मग ती शारीरिक सुरक्षा असो, महिलांची वा मुलींची सुरक्षितता असो, वाहतुकीचे अनियंत्रित स्वरूप असो, की वाढत्या प्रदूषणामुळे धोक्यात आलेले प्रदूषण असो. पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. कोयता गँग, घायावळ टोळी, आंदेकर टोळी या टोळ्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत गंभीर गुन्ह्याचे प्रमाण तब्बल ३० टक्क्यांनी वाढले आहे. चोरी, घरफोडी, वाहनचोरी, खून, बलात्कार, तसा सायबर फसवणूक या घटना दररोज वाढत चालल्या आहेत. २०२४ मध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी मोठा हिस्सा हा सायबर गुन्ह्यांत आहे. ऑनलाइन फसवणूक, फेक लिंकद्वारे पैसे उकळणे, सोशल मीडियावरील छळवणूक आणि बनावट गुंतवणूक योजनांच्या जाळ्यात अडकवले जात आहे. डिजीटल पुणे बनवण्याच्या नादात सायबर गुन्हेगारी वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या पद्धतीत दर आठवड्याला समोर येतात. २०२५ मध्ये १५,००० हून अधिक नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरल्याची नोंद आहे. ताण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक हे या जाळ्यात सर्वाधिक अडकतात. ‘केवायसी अपडेट’,‘बँक लिंक अपडेट’,‘गुंतवणुकीवर दुप्पट परतावा’ अशा प्रलोभनांनी खाते रिकामे केले जात आहे. असुरक्षिततेच सर्वात ठळक चेहरा म्हणजे पुणे शहरातील सध्याची वाहतूक आहे. शहरातील वाहतूक ही मृत्यूचा सापळा बनली आहे. पुण्यातील रस्त्यांवर दररोज कोट्यवधी वाहने धावतात, पण सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्ष होत असते. २०२४ मध्ये वाहतूक विभागाच्या अहवालानुसार, शहरात दर महिन्याला सुमारे ८० अपघातांमध्ये प्राणहानी होते. पादचारी आणि दुचाकीस्वार सर्वाधिक बळी पडतात. दुचाकी पार्किंग, सिग्नल तोडणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि हेल्मेट/सीटबेल्ट अभाव हे रोजचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, शहरात सीसीटीव्ह प्रणाली असतानाही अंमलबजावणीतील ढिलाईमुळे शिस्त नजरेआड होत असते. पुणे शहर हे एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित शहर मानले जायचे. महिला सुरक्षितपणे सहज फिरू शकत होत्या. पण, आताच्या काळात पुणे शहरात महिलांच्या वाढत्या असुरक्षितता हा चिंतेचा विषय बनला आहे. ‘सुरक्षित पुणे‘ हा महिलांसाठी भ्रम झाला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांवर होणारा छेडछाडीचा प्रकार, सार्वजनिक वाहतुकीत होणारी गैरवर्तणूक, तसेच कामाच्या ठिकाणी मानसिक छळ या तक्रारी वाढत आहेत. काही भागांमध्ये विशेषत हडपसर, बाणेर, वाकड, आणि कात्रज परिसरात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित होतात. पोलिसांची उपस्थिती कमी, रस्त्यांवर असलेला अंधार आणि सीसीटीव्ही असून चालू अवस्थेत नसतात याचा फायदा घेण्यात येतो. शहरात वाढता विस्तार पाहता हरित क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस पडला की, शहर तुंबायला सुरुवात होते. तर, उन्हळ्यात पाण्याच्या टँकरची लाईन लागते. मुळा-मुठा नदी प्रदूषणही पुणेकरांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीही असुरक्षित झाले आहे. वृक्षतोड, वाहनांमधील धूर यामुळे हवेतील प्रदूषण वाढत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
प्रशासनाची भूमिका आणि नागरिकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. पुणे महानगरपालिका आणि पोलीस विभाग सतत उपाययोजना जाहीर करतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे, रात्री गस्त, वाहतूक नियंत्रण केंद्रे आणि जनजागृती मोहिमा आहेत. पण केवळ तांत्रिक उपाय पुरेसे नाहीत. नागरिकांनीही स्वत: जबाबदारी ओळखणे गरजचे आहे. नियमांचे पालन, शिस्तबद्ध वाहन चालक, शेजारी सुरक्षा संकल्पना ही काळी गरज आहे. शहर नियोजनातील त्रुटी आहेत. त्या वेळीच दूर केल्या पाहिजेत. पुणे विस्तारत असताना शहरी नियोजनात सुरक्षेला आवश्यक ते प्राधान्य मिळालेले नाही. रस्त्यांवरील अंधार, अप्रुया फुटपाथ, बसथांब्यांवरील सीसीटीव्हीअभावी आणि पाणथळ भागांतील अस्वच्छता ही सर्व असुरक्षिततेची जननी ठरतात. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या गेल्या तरी त्यांची अंमलबजावणी अर्धवट राहिली असल्याचे चित्र आहे.
पुण्याला पुन्हा सुरक्षित शहर म्हणून उभे करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी शिस्तबद्ध नियम अंमलात आणणे आणि कठोर दंडाची अंमलबजावणी गरजेची आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांची अधिक गस्त, सीसीटीव्ही नेटवर्क वाढविणे गरजेचे आहे. तसे त्यांना सुरक्षित प्रवास करण्याची हमीही मिळाली पाहिजे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी अनेक मोहिमा राबवणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत सुरक्षित शहर होण्यासाठी सहभाग घेणे आवश्यक आहे. पुणे हे केवळ एक शहर नाही, तर ती एक भावना आहे. संस्कृतीचे शहर आहे. असुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले, तर हे शहर आपली ओळख गमावेल. सुरक्षित पुणे हे केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. कायदा, संस्कृती, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी या सर्व पातळ्यांवर जर आपण सजग राहिलो, तर पुणे पुन्हा एकदा आदर्श आणि सुरक्षित शहर म्हणून उभे राहील अशी खात्री आहे.