मुंबई: ‘बोपोडीमधील कथित भूखंड गैरव्यवहाराशी माझा काहीच संबंध नसताना मला त्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे माझ्याविरोधातील तो एफआयआर रद्द करावा’ अशी विनंती तेजवानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. पुण्यातील मुंढवा येथील प्रकरणात समोर आलेल्या शीतल तेजवानी यांचे अजून एक जमिन गैरव्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात त्यांचे नाव जोडल्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व अमेडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होतो. या प्रकरणात पार्थसोबतच इतर अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. ज्यात शीतल तेजवानी यांचे नावदेखील आहे. मात्र मुंढवातील प्रकरणानंतर आता बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले. बोपोडी येथील प्रकरणात तेजवानी यांच्या विरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात माझा काही संबंध नसल्याचे सांगत तेजवानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाची वाट धरली आहे.
"खडक पोलिसांनी दाखल केलेल्या बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील एफआयआरमध्ये माझे नाव निव्वळ तांत्रिक पद्धतीने समाविष्ट करण्यात आले आहे. त्या व्यवहाराशी माझा काहीच संबंध नाही. तहसीलदार सूर्यकांत येवले व अन्य काहींच्या कथित कृतींबद्दल तो एफआयआर करण्यात आला आहे. त्या प्रकरणात माझ्याविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई झाल्यास माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसेल आणि माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचेही उल्लंघन होईल. त्यामुळे माझ्याशी संबंधित तो एफआयआर रद्द करावा किंवा याचिकेवरील अंतिम निर्णयापर्यंत माझ्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश खडक पोलिसांना द्यावेत’, अशी विनंती तेजवानी यांनी केली आहे.
मुंढवा येथील जमिनीचा अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीसोबत झालेल्या व्यवहारात मी तत्कालीन कुलमुखत्याधारक होते. तो व्यवहार निव्वळ दिवाणी स्वरूपाचा आहे. त्यात फसवणूक अथवा गुन्हेगारी स्वरूपाचे काही नाही. शिवाय त्या व्यवहाराविषयी झालेल्या आरोपांची राज्य सरकारने ७ नोव्हेंबरला दखल घेतली. तसेच महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीला चौकशी करून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिलेले आहेत. दरम्यान बोपोडी येथील सुमारे पाच हेक्टर जमिनीच्या कथित गैरव्यवहाराबाबत एफआयआर दाखल करण्यात आला.






