२६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रंगणार SA20 चा चौथा सीझन
ग्रॅमी स्मिथ, फाफ डू प्लेसिस, मिलर यांची मुंबईत हजेरी, भारतीय फॅनबेसची ताकद वाढली
मुंबई : दक्षिण आफ्रिकेची प्रतिष्ठेची टी-२० क्रिकेट लीग असलेल्या 'एसए२०' (SA20) ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. याचे स्पष्ट दर्शन मुंबईतील यशस्वी 'एसए२० इंडिया डे २०२५' कार्यक्रमात झाले. या सोहळ्याने लीग आणि भारतीय उपखंडातील क्रिकेट चाहत्यांमधील वाढते सांस्कृतिक नाते अधोरेखित केले. या कार्यक्रमानंतर आता २६ डिसेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या आगामी चौथ्या सीझनसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
क्रिकेट दिग्गजांची मांदियाळी
म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) येथे आयोजित या भव्य कार्यक्रमाला एसए२० चे कमिशनर ग्रॅमी स्मिथ यांनी हजेरी लावली. त्यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकेतील आणि लीगचे मोठे चेहरे उपस्थित होते, ज्यात जोबर्ग सुपर किंग्जचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, पार्ल रॉयल्सचा डेव्हिड मिलर, डर्बन सुपर जायंट्सचे ग्लोबल डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मूडी, एमआय केप टाऊनचे प्रशिक्षक हाशिम आमला आणि दिग्गज खेळाडू मार्क बाउचर यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, सनरायझर्स इस्टर्न केपचा ट्रिस्टन स्टब्स, त्यांचे मुख्य प्रशिक्षक अॅड्रियन बिरेल्ल आणि प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक सौरव गांगुली यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे आपला पाठिंबा व्यक्त केला. फ्रँचायझी प्रतिनिधी आणि जिओस्टार या अधिकृत प्रसारकानेही या सोहळ्याची शोभा वाढवली.
लीगची वाढती जागतिक प्रतिमा
एसए२० ने पहिल्या तीन सीझनमध्ये भारताबाहेर सर्वात मोठी टी-२० लीग म्हणून आपली ओळख मजबूत केली आहे. आयपीएल संघांच्या मालकीचा आणि जिओस्टार सारख्या प्रसारक भागीदाराचा भक्कम पाठिंबा या लीगला मिळाला आहे. केन विल्यमसन, जो रूट, जॉस बटलर, सुनील नारायण, आंद्रे रसेल, ट्रेंट बोल्ट यांसारखे आंतरराष्ट्रीय स्टार्स आणि डिवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, क्वेना माफाका यांसारखे उदयोन्मुख दक्षिण आफ्रिकन युवा खेळाडू या लीगमध्ये एकत्र खेळतात.
तिसरा सीझन या लीगसाठी महत्त्वाचा ठरला. यात 'सोल्ड आऊट' सामन्यांमध्ये ७०% वाढ झाली. अंतिम सामना सलग तिसऱ्या वर्षी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पार पडला. तसेच, भारत, यूके, यूएस आणि संपूर्ण आफ्रिकन बाजारपेठांमधील जागतिक टीव्ही प्रेक्षकसंख्येत ३७% ची विक्रमी वाढ नोंदवली गेली.
भारत आमच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी: ग्रॅमी स्मिथ
एसए२० लीग कमिशनर ग्रॅमी स्मिथ यांनी भारतीय चाहत्यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, "भारत सुरुवातीपासूनच एसए२० च्या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आयपीएल फ्रँचायझींचे पाठबळ आणि जिओस्टारसोबतची भागीदारी आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतीय चाहत्यांचा उत्साह आम्हाला प्रत्येक सीझनमध्ये प्रेरणा देतो. सीझन ४ कडे जाताना आम्ही हा बंध अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत."
फाफ डू प्लेसिसने या लीगची प्रशंसा करताना म्हटले, "ही स्पर्धात्मक, मनोरंजक आणि खऱ्या अर्थाने जागतिक अशी जगातील सर्वोत्तम टी-२० लीगपैकी एक आहे. भारतात आमचे सामने पाहिले जातात आणि चाहते आमच्याशी जोडले जातात, हे पाहून खूप आनंद होतो." तर डेव्हिड मिलरने चाहत्यांशी असलेल्या मजबूत भावनिक संबंधावर भर दिला. टॉम मूडी आणि हाशिम आमला यांनीही आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेतील उदयोन्मुख प्रतिभेसाठी ही लीग एक महत्त्वपूर्ण मंच असल्याचे सांगितले.
'एसए२० इंडिया डे २०२५' मध्ये जिओस्टारने सीझन ४ चा आकर्षक प्रोमो लाँच केला. या प्रोमोतून आगामी सिझनच्या थरारक अनुभवाची झलक दाखवण्यात आली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.






