सुरक्षेवरील कॅबिनेट समितीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१२ नोव्हेंबर, २०२५) भूतानच्या दोन दिवसीय शासकीय दौऱ्यावरून भारतात परतले आणि थेट सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या स्फोटाबद्दल अधिक माहिती घेतली. विशेष म्हणजे, या स्फोटानंतर काही तासांतच गृहमंत्री अमित शाह यांनीही रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली होती आणि घटनास्थळाची पाहणी केली होती.
रुग्णालयात जाऊन केली विचारपूस
मिळालेल्या माहितीनुसार, भूतानहून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट रुग्णालयात जाऊन दिल्ली बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली. तसेच, या स्फोटाच्या घटनेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती आणि अहवाल घेतला.
सायंकाळी ५.३० वाजता 'CCS' ची निर्णायक बैठक
दौऱ्यावरून परत आल्यानंतर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी ५.३० वाजता 'सुरक्षेवरील कॅबिनेट समिती' अर्थात CCS (Cabinet Committee on Security) च्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सोमवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीत दिल्लीच्या सुरक्षेबाबत आणि स्फोटाच्या तपासाच्या प्रगतीबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या गंभीर घटनेनंतर पंतप्रधान मोदी काय प्रतिक्रिया देतात आणि कोणते निर्देश देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१२ नोव्हेंबर, २०२५) भूतानच्या दोन दिवसीय शासकीय दौऱ्यावरून भारतात परतले. ते मंगळवारी भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. भूतानमध्ये त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले आणि राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यासोबत ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली.






