Wednesday, November 12, 2025

पंढरपूरच्या विठुरायाला भरली हुडहुडी! होळीपर्यंत असतो विठुरायाच्या हा खास पोषक

पंढरपूरच्या विठुरायाला भरली हुडहुडी! होळीपर्यंत असतो विठुरायाच्या हा खास पोषक
पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत चालला आहे. आणि तापमानाचा पारा गोठत चालला आहे त्यामुळे साक्षात विठुरायालाही या थंडीमुळे हुडहुडी भरली असून देवाला ऊब देण्यासाठी उबदार रजई, शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थंडीचा कडाका वाढत चालल्याने देवाला हे उबदार कपडे देण्यास सुरुवात होते. रात्री आरतीनंतर जेव्हा विठुराया निद्रेसाठी जातो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढून देवाचे अंग पुसले जाते. डोक्यावरील मुकुट काढून, हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठयपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते.   यानंतर देवाला थंडी वाजू नये म्हणून सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते. देवाच्या उघड्या अंगावर पांढरा शुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात येतो. यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार शाल अंगावर टाकून त्यावर खास काश्मिरी रजई घालण्यात येते . या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते यानंतर देवाला तुळशीहार घालून आरती करीत देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते. पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील ही काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात . साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्यात येत असून साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात   याच पद्धतीने रुक्मिणी मातेलाही उबदार काश्मिरी शाल परिधान करण्यात येते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >