Wednesday, November 12, 2025

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा

महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला

नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला

चिपळूण : महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून लढविल्या जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळुणात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या घोषणेने महायुतीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे दोन दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अजूनही शिकून मध्ये एकाने अर्ज दाखल केलेला नाही तर दुसरीकडे महायुती की महाविकास आघाडीतर्फे निवडणुका लढल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश दादा कदम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी चिपळूणमधील हॉटेल अतिथीच्या सभागृहात एकवटले होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर ना. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महायुतीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, अशी घोषणा करताना मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह आमच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महायुतीतर्फे निवडणुका लढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. तर आता चिपळूणमध्ये महायुतीची बैठक होण्यापूर्वी आमदार शेखर निकम यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी व पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती ना. उदय सामंत यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, आम्ही महायुतीचा संकल्प केलेला आहे. याचे रूपांतर ३ तारखेला विजयात होणार आहे, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यासह धाराशिव, परभणी येथे देखील महायुतीतर्फे निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत यांनी महायुतीतर्फे निवडणुका लढवल्या जातील अशी घोषणा केल्याने अखेर महायुतीचा सस्पेन्स संपला आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल असे शेवटी सांगितले.

यावेळी राज्याचे गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, चिपळूण तालुका प्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा निर्णय गुलदस्त्यात

महायुतीचा सस्पेन्स संपला असला तरी महाविकास आघाडीचा अजून निर्णय गुलदस्त्यात असल्याने महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार बुचकळ्यात सापडले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा