Wednesday, November 12, 2025

आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, कंटेनर दिडींत घुसल्याने महिला किर्तनकाराचा मृत्यू!

आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, कंटेनर दिडींत घुसल्याने महिला किर्तनकाराचा मृत्यू!

आळंदी: आळंदीला पायी निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या अपघातात उरण येथील कीर्तनकार मंजुळा तांडेल यांचे निधन झाले आहे. गेल्या १८ वर्षांपासून उरण तालुक्यातील जासई येथील शंकर मंदिरातून उरण ते आळंदी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात उरण आणि जासई, करळ, कामोठे, पारगावसह इतर गावांतील अंदाजे १५० भाविक या दिंडीत सामील झाले होते. मात्र ज्ञानेश्वरांच्या भेटीला जाणाऱ्या या भाविकांवर काळाने घाला केला.

काल, ११ नोव्हेंबरच्या रात्री कामशेत येथील काळभैरव मंदिरात मुक्काम करून आज सकाळी ५.४५ वाजता दिंडी इंदुरीच्या दिशेने रवाना झाली होती. काही किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर एका भरधाव कंटेनर ट्रेलरने दिंडीतील भाविकांना जोरदार धडक दिली. या अपघातात उरण तालुक्यातील करळ येथील मंजुळा तांडेल (वय ५४ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य १० भाविक जखमी झाले आहेत. यातील दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत.दरम्यान कंटेनर चालक चंद्रशेखर रमाकांत याच्याविरोधात कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय विष्णू घरत (वय ६२), हिराबाई पोशा पाटील (वय ६५), शारदा नितीन ठाकूर (वय ५१), कामिनी दत्तात्रय गांधी (वय ३०), अपर्णा अनंत ठाकूर (वय ४२), प्रभाकर लक्ष्मण तांडेल (वय ६२), अशोक पायप्पा गंधाला (वय ३०) नंदू अप्पा चोपडे (वय ५५) ज्ञानदेव निवृत्ती गाडे (वय ५७), तानाजी पुनाजी हेमाडे (वय २७) अशी जखमींची नावे आहेत.

Comments
Add Comment