दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
वयाच्या १३ व्या वर्षी लग्न, स्वतःच्या मुलाला मांडीवर घेऊन दहावीची परीक्षा, बेकरी कोर्स करून ती कोलकात्याची बेकरी क्वीन बनली. तिच्या मिठाईच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल २० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही प्रेरणादायी गोष्ट आहे, शुगर अँड स्पाइसच्या सुप्रिया रॉय यांची.
सुप्रिया रॉयचा जन्म कोलकात्यातील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुप्रियाला सात भावंडे होती. सुप्रियाचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. अत्यंत कष्टाने त्यांनी व्यवसाय उभारला होता. १९६३ मध्ये, त्या काळातील प्रथेप्रमाणे, सुप्रिया जेव्हा फक्त १३ वर्षांची होती, तेव्हा तिचे लग्न कोलकात्यात राहणाऱ्या मुर्शिदाबादच्या एका जमीनदाराच्या मुलाशी झाले. खरंतर तिला पुढे शिकायचं होतं. पण तिला तिच्या कुटुंबाच्या इच्छेला बळी पडावे लागले. तिचे पती प्रशांत कुमार रॉय त्यावेळी पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करत होते. सुप्रिया जेव्हा एका बाळाची आई झाली तेव्हा ती दहावीत शिकत होती. बाळाला आपल्या मांडीवर घेऊन तिने त्याकाळी दहावीची परीक्षा दिली.
आपण चित्रपटात पाहतो तशीच जमीनदारांचा भला मोठा वाडा सुप्रियाच्या सासरी होता. १९२० च्या दशकात तो बांधला गेला होता. त्याची देखभाल करण्यासाठी दोन डझनहून अधिक लोकांची आवश्यकता होती. मात्र जमीनदारी व्यवस्था संपल्यानंतर सुप्रियाच्या सासरच्यांची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली होती. ती अनेकदा आपली ढासळती आर्थिक स्थिती पाहून रडत असे. तिला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटे. अशा या प्रतिकूल परिस्थितीत तिला एक आशेचा किरण दिसला. तिला लहानपणापासूनच बेकिंगची आवड होती. कलकत्ता विद्यापीठातून पत्रव्यवहाराद्वारे पदवी प्राप्त केल्यानंतर तिने बेकरी, कॉन्टिनेंटल फूड आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने कोलकात्यातील तारातला येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशनमधून बेकरी, कॉन्टिनेंटल फूड आणि हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
रॉयने तिच्या सासरच्या मंडळींकडून त्यांच्या मोठ्या घराच्या एका भागात कला आणि हस्तकला वर्ग सुरू करण्याची परवानगी मागितली. तिचे कुटुंब महिलांनी काम करण्याबाबत रूढीवादी विचारांचे होते. मात्र सुप्रियाच्या सासऱ्यांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला. सुप्रियाने १९८५ मध्ये फक्त एका विद्यार्थ्यासह बेकरी वर्ग सुरू केले. अल्पावधीत बेकिंग, कॉन्टिनेंटल आणि भारतीय स्वयंपाक तसेच टेलरिंग आणि टायपिंग शिकण्यासाठी विद्यार्थी रांगेत उभे राहू लागले. सुप्रियाने काही शिक्षक देखील नियुक्त केले.
ते १९९० साल होते. सुप्रियाचा मुलगा मोठा झाला होता. ती चाळीस वर्षांची होती. तिने तिच्या आयुष्याची आणि तिच्या कामाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता तिने तिच्या घराच्या आवारात तिचे पहिले बेकरी दुकान ‘द शुगर अँड स्पाइस’ सुरू केले.
२०० चौरस मीटर क्षेत्रात तिचे दुकान तिने थाटले. तिने सुरू केलेल्या वर्गाच्या बचतीतून तीन लाख रुपये जमा केले होते. तेच तिचे भांडवल होते. सोबतीला १२ कर्मचारी होते. ज्यात ती स्वतःही होती. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. लवकरच त्यांना मौखिक लोकप्रियता मिळू लागली. पती प्रशांत कुमार रॉय यांच्या अधूनमधून सल्ल्याने, व्यवसाय वाढू लागला आणि नफा मिळवू लागला. ९९५ मध्ये पाच वर्षांतच, त्यांनी फ्रँचायझींद्वारे विस्तार करण्याचा निर्णय घेतला. फ्रँचायझींनी राज्यभर बेकरीची उत्पादने उपलब्ध करून देण्यास मदत केली. तिच्या घराच्या ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर उत्पादन केंद्र उभारण्यात आले.
सुरुवातीला मालकी हक्काने काम करणारी ही कंपनी १९९८ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड बनली, त्याच वर्षी तिने फ्रँचायझी देऊ करण्यास सुरुवात केली. १९९८ ते २००० दरम्यान, कंपनीची वाढ दरवर्षी २०० टक्क्यांपर्यंत वाढली आणि पुढील पाच वर्षांत ती ४०० टक्क्यांपर्यंत पोहोचली. २००० मध्ये, सुप्रिया रॉय यांना तत्कालीन लघु उद्योग मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक (आणि लघु उद्योग म्हणून कामगिरीसाठी) म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले, ही पहिलीच वेळ होती जेव्हा बेकरी आणि मिठाई उद्योगाला असा पुरस्कार देण्यात आला.
पुढील काही वर्षे व्यवसाय हळूहळू वाढत गेला. मात्र एक दुर्दैवी घटना घडली. २००६ मध्ये, एका विश्वासू कर्मचाऱ्याने आणि आर्थिक मदतनीसाने सुप्रिया रॉय यांची फसवणूक केली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. हे नुकसान काही कोटी रुपयांचे होते. कंपनी दिवाळखोरीच्या जवळ पोहोचली होती. कर्मचाऱ्यांना पैसे देण्यास असमर्थ आणि कर्जबाजारी असल्याने सुप्रिया यांनी हे आव्हान धडा म्हणून स्वीकारले आणि प्रत्येक गोष्टीवर वैयक्तिकरित्या देखरेख करण्याचा निर्णय घेतला. अखेर २००९ मध्ये पुन्हा कंपनी नफ्यात आली. ‘द शुगर अँड स्पाइस’ हे आयएसओ ९००१:२००८ प्रमाणित झालेले पहिले बेकर आणि कन्फेक्शनर्स बनले.
सुप्रियाची कंपनी डीलर्स आणि वितरकांच्या नेटवर्कद्वारे पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, भूतान आणि बांगलादेशमध्ये आपली उत्पादने विकते. २०१० च्या अखेरीस, कंपनीकडे आधीच १०० आउटलेट होते. सुप्रियाची कंपनी आता केक, पेस्ट्री, ब्रेड, सँडविच, बर्गर, पिझ्झा, हॉट डॉग, क्रोइसंट, पॅटीज, रोल, कबाब आणि तंदुरी आयटम तसेच चॉकलेट, कुकीज आणि वेफर्स सारख्या पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थासह ५१ उत्पादने बनवते. पश्चिम बंगालमध्ये शुगर अँड स्पाइसचे १२५ आउटलेट आहेत, त्यापैकी ११० शहरात आहेत. त्यापैकी ४० पूर्णपणे कंपनीच्या मालकीचे आहेत आणि उर्वरित फ्रँचायझी आहेत. एका वेबसाईटनुसार कंपनीची उलाढाल २० कोटी आहे. सुप्रिया रॉय आज बेकरी उद्योगातील एक मानाचे नाव आहे. प्रचंड मेहनत, सातत्य, नवीन गोष्टींचा ध्यास, धाडसी वृत्ती, निडरपणा या गुणांमुळेच सुप्रिया रॉय बेकरी उद्योगातील लेडी बॉस बनल्या आहेत.