Wednesday, November 12, 2025

सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात ६ हत्तीचं वावर ; ओंकार हत्तीला सोपवणार वनतारा कडे

सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात ६ हत्तीचं वावर ; ओंकार हत्तीला सोपवणार वनतारा कडे

सिंधुदुर्ग : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वाढता वावर पाहायला मिळत आहे. सध्या या भागात तब्बल सहा हत्तींचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या हत्तींपैकी ‘ओंकार’ हत्ती बांधा आणि वाफोली परिसरात सक्रिय आहे, तर ‘बाहुबली’ हत्ती आंबोली परिसरात दिसून येत आहे. याशिवाय चार हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यातील तिलारी भागात स्थिरावल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच ‘ओंकार’ हत्तीने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर वन विभागाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक पर्यावरणप्रेमी आणि प्राणीमित्र संघटनांनी ‘ओंकार’ला पकडून ‘वनतारा’ संस्थेकडे सोपवण्याच्या निर्णयाचा विरोध केला असून, त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली आहे.

बांधा गावातील ग्रामस्थ गुणेश गवास यांनी या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांना साईप्रसाद कल्याणकर आणि शाम धुरी यांनीही पाठिंबा दिला. वन विभागाने मात्र हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटकर नगर येथे ‘ओंकार’ला ठेवण्यासाठी विशेष कॅम्प उभारण्याची घोषणा वन विभागाने केली असली तरी प्रत्यक्षात त्या दिशेने अद्याप हालचाल झालेली नाही. त्यामुळे ‘ओंकार’ला तात्पुरते वनतारा संस्थेकडे हलवून, नंतर कोल्हापूर कॅम्प तयार झाल्यावर परत आणले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली असून, १४ नोव्हेंबरपर्यंत वन विभागाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, आंबोली, वाफोली आणि तिलारी परिसरात हत्तींच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या भात कापणी आणि मळणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बागायती शेती आणि वायंगणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने संरक्षणात्मक उपाययोजनांची मागणी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे वन विभाग, न्यायालय आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये ताण निर्माण झाला असून, ‘ओंकार’ हत्तीचे भवितव्य पुढील काही दिवसांत न्यायालयीन निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >