लखनऊ : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस-यूपी) एका महिला डॉक्टरच्या घरी छापा टाकला. या महिला डॉक्टरचे नाव शाहीन असून ती दहशतवादी मुजम्मिलची प्रेयसी आहे. शाहीन हिला आधीच ताब्यात घेतले असून तिचा संबंध फरीदाबादच्या दहशतवादी मॉड्यूलशी असल्याचे समोर आलेय.
जम्मू-कश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका दहशतवादी गटाचा भंडाफोड केला होता, ज्यामध्ये सहारनपूरचे रहिवासी डॉ. आदिलला अटक करण्यात आली होती. त्याच्या माहितीच्या आधारे डॉ. मुजम्मिललाही अटक करण्यात आली. तपासात असेही समोर आले की स्फोटासाठी वापरलेली कार ही मुजम्मिलच्या मैत्रीण, लालबाग येथे राहणाऱ्या डॉ. शाहीन शाहिद हिच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मंगळवारी एटीएसची टीम लखनौतील शाहीन शाहिद हिच्या पुश्तैनी घरावर छापेमारीसाठी पोहोचली. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी ७ वाजता कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
यूपी-एटीएस आणि जम्मू-कश्मीर पोलिसांची संयुक्त टीम लखनऊच्या मडियांव भागातील आयआयएम रोड, मुत्तकीपूर येथे एका डॉक्टरच्या घरावर धाड टाकली. ही कारवाई फरीदाबादमध्ये पकडलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित सूत्रांच्या तपासाचा भाग आहे.
शाहीन ही मुळची लखनऊची असून तिला एक दिवस आधी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. शाहीन ही डॉ. मुजम्मिलची प्रेयसी असून तिचा दिल्ली स्फोटात सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. शाहीनच्या घरमालकाचे नाव डॉ. परवेज अन्सारी असून त्याच्या गाडीत इंटिग्रल युनिव्हर्सिटीचा पास सापडला आहे.






