Tuesday, November 11, 2025

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

SC साठी ५, ST साठी १ जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांचे धाबे दणाणले!

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) आगामी निवडणुकीसाठी आज (११ नोव्हेंबर) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आरक्षण सोडत (Reservation Lottery) प्रक्रिया उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक दिग्गज नेत्यांना आपले प्रभाग सोडावे लागण्याची वेळ आली आहे. आगामी महापालिकेत एकूण १११ सदस्य निवडून दिले जाणार असून, यापैकी तब्बल ५६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. म्हणजेच, नवी मुंबई महापालिकेत महिला सदस्यांचे वर्चस्व दिसणार आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण २८ प्रभाग आहेत. त्यापैकी २७ प्रभाग चार सदस्यीय (Four-member wards) तर प्रभाग क्रमांक २८ हा तीन सदस्यीय असणार आहे. या १११ सदस्यांसाठी आरक्षण निश्चित करताना, सन २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानुसार शहराची एकूण लोकसंख्या ११ लाख ३६ हजार १७० इतकी असून, अनुसूचित जातींची लोकसंख्या १ लाख ८३९, तर अनुसूचित जमातीची १९ हजार ६४६ नोंदवली गेली आहे.

आरक्षण सोडतीनुसार, अनुसूचित जाती (SC) साठीच्या १० जागांपैकी ५ जागा महिलांसाठी (१/अ, २/अ, ४/अ, २०/अ, २८/अ) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, अनुसूचित जमाती (ST) साठीच्या २ जागांपैकी १ जागा (६/ब) महिलांसाठी आरक्षित झाली आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC) एकूण २९ जागांपैकी १५ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील इतर जागा २/ब, ४/ब, ५/ब, ६/क, ९/अ, १०/अ, १२/अ, १३/अ, १५/अ, १७/अ, १९/अ, २४/अ, २५/अ, २६/अ या गटांसाठी खुल्या झाल्या आहेत.

सर्वाधिक ७० जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून, यातही नियमानुसार ३५ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व जागांसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.

या आरक्षण सोडतीचा प्रारूप आराखडा सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले आहे की, १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत नागरिक या आरक्षणाबाबतच्या हरकती व सूचना वाशी येथील महापालिका मुख्यालय किंवा संबंधित आठ प्रभाग समिती कार्यालयात सादर करू शकतात. मात्र, ऑनलाइन स्वरुपात किंवा ई-मेलद्वारे आलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. हरकतींवर निर्णय झाल्यानंतर अंतिम आरक्षण अधिसूचना जारी केली जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >