Tuesday, November 11, 2025

लाल किल्ला मेट्रोजवळ भीषण स्फोट; फरिदाबाद मॉड्युलचा उमर मोहम्मद प्रमुख सूत्रधार ?

लाल किल्ला मेट्रोजवळ भीषण स्फोट; फरिदाबाद मॉड्युलचा उमर मोहम्मद प्रमुख सूत्रधार ?

नवी दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोमवारी झालेला स्फोट हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे तपास यंत्रणांकडून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की एका आय-२० कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती आणि ती उडवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा आत्मघातकी हल्ला होता. या घटनेचा संबंध फरिदाबादमधील दहशतवादी मॉड्युलशी जोडला गेला आहे.

घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमधील मृतदेहाची डीएनए चाचणी करून ती व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे. उमर मोहम्मद याचा फरिदाबाद मॉड्युलशी थेट संबंध होता आणि तो बराच काळ फरार होता. उमरनेच हा हल्ला घाईघाईत केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरने दोन साथीदारांसह हा स्फोट करण्याचा निर्णय घेतला होता. फरिदाबादमध्ये अटक मोहीम सुरू झाल्यानंतर तो पकडला जाण्याच्या भीतीने घाबरला. त्याने तातडीने आत्मघातकी कारबॉम्ब स्फोटाची योजना आखली आणि साथीदारांच्या मदतीने कारमध्ये डेटोनेटर बसवून स्फोट घडवून आणला.

दिल्ली पोलिसांनी आय-२० कारचा मार्ग शोधण्यासाठी सीसीटीव्ही मॅपिंग केले. ही कार शेवटची बदरपूर सीमेवर दिसली होती. बदरपूरहून दिल्लीत प्रवेश केल्यानंतर ती लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ दिसली. त्यापूर्वी ती सुवर्ण मशिदीजवळील पार्किंगमध्ये तीन तास उभी होती. दुपारी सुमारे ३:०९ वाजता ती पार्किंगमध्ये आली आणि संध्याकाळी ६:४८ वाजता बाहेर पडली. सात मिनिटांनी म्हणजेच ६:५५ वाजता स्फोट झाला.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये कारमध्ये उमर एकटाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणा दर्यागंज मार्गावरील सर्व वाहनांचे फूटेज तपासत आहेत. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही क्लिप तपासल्या गेल्या आहेत.

या कारचा जम्मू-काश्मीरशी थेट संबंध असल्याचेही उघड झाले आहे. आय-२० कार आधी मोहम्मद सलमानच्या नावावर होती. त्याने ती नदीमला विकली, त्यानंतर ती फरिदाबादमधील डीलरकडे गेली, आणि नंतर तारिकमार्फत उमरकडे पोहोचली. कारचा आरसी गुरुग्रामच्या आरटीओमध्ये नोंदणीकृत होता.

पुलवामातील सांबुरा येथे पोलिसांनी काल रात्री तारिकला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. या व्यवहारातील आणखी एक व्यक्ती आमिर याचाही तपास सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिस या सर्वांना चौकशीत सहभागी करत आहेत.

तपासात पोलिसांना प्राथमिक संकेत मिळाले आहेत की या कारमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर झाला असावा, मात्र एफएसएल अहवालानंतरच याची अधिकृत पुष्टी होईल.

फरिदाबाद कनेक्शन तपासत असताना पोलिसांनी डॉ. मुझम्मिल अहमद गनई (फरिदाबाद), डॉ. आदिल अहमद राथेर (पुलवामा) आणि डॉ. शाहीन शाहिद (लखनऊ) यांना अटक केली आहे. डॉ. उमर मोहम्मद हा अजूनही फरार आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक झाली असून २,९०० किलो स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी कायद्याच्या कलमांखाली आणि स्फोटक पदार्थ कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तसेच खून आणि खुनाचा प्रयत्न या कलमांचाही समावेश केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >