Monday, November 10, 2025

भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

क्रिकेटची सुमारे १५० वर्षांची परंपरा मोडीत

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळली जाईल, तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे. या दुसऱ्या कसोटीत एक अनोखा बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे लंचपूर्वी टी ब्रेक घेतला जाणार आहे. भारतात कसोटी सामन्यांमध्ये असा बदल प्रथमच होणार आहे.

टॉस, लंच, चहा, स्टंप (दिवसाचा खेळ संपला)… कसोटी सामन्यांमध्ये हा नेहमीचा क्रम आहे, परंतु २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा क्रम बदलणार आहे. पहिल्यांदाच खेळाडूंना लंचच्या आधीच टी ब्रेक मिळेल. देशाच्या पूर्व भागात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होता, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळाचा पहिला सत्र सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ११ ते ११.२० वाजेपर्यंत टी ब्रेक दिला जाईल. दुसरे सत्र ११.२० ते दुपारी १.२० या वेळेत खेळले जाईल आणि मग १.२० ते २ वाजेपर्यंत लंच ब्रेक असेल. अखेरचे सत्र दुपारी २ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पार पडेल. मैदानावर अतिरिक्त खेळण्यासाठी वेळ मिळावा यासाठी टी ब्रेकच्या सत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

गुवाहाटीत सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे सामना सकाळीच लवकर सुरू करावा लागतो. खेळाचा वेळ वाढवण्यासाठी लंचपूर्वी टी ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामन्यामध्ये दोन तासांचा खेळ होतो, त्यानंतर ४० मिनिटांचा लंच ब्रेक होतो. यानंतर पुन्हा दुसरे सत्र २ तासांचे असते. त्यानंतर २० मिनिटांचा टी ब्रेक होतो.

रणजी ट्रॉफीत आधीच झालेला प्रयोग सामान्यतः भारतातील कसोटी सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतात. ४० मिनिटांचा लंच ब्रेक (११.३० ते १२.१०) आणि २० मिनिटांचा टी ब्रेक (२.१० ते २.३०) असा असतो. तिसरे सत्र २.३० ते ४.३० चालते. दिवसाला ९० षटके पूर्ण करण्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो. याआधीही बीसीसीआयने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये सूर्यास्ताच्या वेळेनुसार सत्रांचे वेळापत्रक बदलले आहे आणि आता तोच प्रयोग आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिल्यांदाच होणार आहे.

Comments
Add Comment