नवी दिल्ली: शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या, १२ नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू करणार आहे. या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही याचा निर्णायक परिणाम होऊ शकतो. तसेच या निकालामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 'खरी शिवसेना' म्हणून मान्यता दिली होती आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला दिले होते.
उद्धव ठाकरे यांच्या याचिकेत निवडणूक आयोगाने केवळ विधान मंडळातील संख्याबळाच्या आधारावर निर्णय घेऊन आपली तटस्थता गमावली, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचा दावा आहे की, त्यांच्या पक्षाकडेच महाराष्ट्र विधान परिषद आणि राज्यसभा येथे बहुमत आहे आणि सर्व पुरावे विचारात न घेता पक्षाची फूट झाली, असे गृहीत धरणे आयोगाचे 'चुकीचे' होते. आता पुढील सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






