Monday, November 10, 2025

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती गरजेची !

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती गरजेची !

रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना

मुंबई  : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार तसेच गृह, परिवहन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सनितीचे अध्यक्ष अभय सप्रे ९ ते १४ नोव्हेंबरदरम्यान मुंबई–पुणे दौऱ्यावर असून, रस्ता सुरक्षा सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत रस्ता अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना करण्यात आली. केंद्र सरकारच्या आयआरएडी पोर्टलचा प्रभावी वापर, आयटीएमएस, एटीएस आणि एडीटीटी प्रकल्पांची गतिमान अंमलबजावणी, तसेच हेल्मेटचा अनिवार्य वापर या विषयांवरही समितीने भर दिला. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच जिल्हास्तरावर नियमितपणे रस्ता सुरक्षा समित्यांच्या बैठका घेऊन अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Comments
Add Comment